(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : शिवसेनेच्या निशाण्यावर असणारे भाजपचे 'ते' साडेतीन नेते कोण? 'या' नावांची चर्चा
Shivsena Press Conference : शिवसेनेच्या निशाण्यावर भाजपचे कोणते नेते आहेत, याबाबतची चर्चा सुरू आहे.
Shivsena Press Confernce : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' (Three and a half) नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेत ही नावं उघड होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत?
किरीट सोमय्या : सध्या राजकीय वर्तुळात विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात आहे. सोमय्या यांनी काही प्रकरणांमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे सोमय्या यांचे एखादे प्रकरण शिवसेना उघडकीस आणणार असल्याचे म्हटले जात आहे.
आशिष शेलार : मुंबई महापालिकेच्या कारभारावरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडून सातत्याने टीका केली जाते. आदित्य ठाकरे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या 'कोस्टल रोड' प्रकल्पात गैरव्यवहार झाला असल्याचे आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता. आशिष शेलार यांच्याशी निगडीत एखादा गैरव्यवहार समोर येतो का, याबाबत चर्चा सुरू आहेत.
चंद्रकांत पाटील : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सातत्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडून टीका सुरू असते. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे माजी महसूल मंत्रीदेखील होते.
प्रवीण दरेकर : मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकर गोवले असल्याचा आरोप करण्यात येतो. दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई बँकेच्या संचालकपदी असताना त्यांनी घेतलेले काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
चंद्रशेखर बावनकुळे: ओबीसी आरक्षण इतर मुद्यांवरून बावनकुळे यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले जात आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होते.
प्रसाद लाड: कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे प्रसाद लाड हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातले समजले जातात. प्रसाद लाड यांचे काही उद्योग-व्यवसाय आहेत. शिवसेना आणि राज्य सरकारवर त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जातात.
गिरीश महाजन: गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू होते. खडसे भाजप यांनी भाजप सोडल्यानंतर त्यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरू केली आहे.
देवेंद्र फडणवीस : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित एखादे प्रकरण उजेडात येईल अशी चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन इशारा दिला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Shivsena Press Conference : शिवसेनेची आज पत्रकार परिषद; पोलीस बंदोबस्तात वाढ, मुंबईकरांना केले 'हे' आवाहन
- ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha