Shiv Sena Clash : बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा; पोलीस अॅक्शन मोडमध्ये, परिसरात तणावपूर्ण शांतता
Shiv Sena Clash in Mumbai : दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत स्मृतीस्थळ परिसर रिकामा केला.
Shiv Sena Clash : शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) आणि ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाली. जवळपास तीन-साडेतीन तास शिवाजी पार्क परिसरात गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत स्मृतीस्थळ परिसर रिकामा केला. त्यानंतर आता, पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
बाळासाहेब स्मृती स्थळावर झालेल्या राड्यावरून पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत. पोलीस सर्व घटनाक्रम तपासून गुन्हे नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब स्मृतीस्थळावर नक्की काय घडलं याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ परिसरात झालेल्या राड्याच्यावेळी पोलिसांनी कारवाई करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते स्मृतीस्थळावरून परतले होते.
तर, दुसरीकडे शिंदे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांचे या ठिकाणी काम नाही. आम्हाला स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळाजवळ ठिय्या मारला होता.
राडा नेमका झाला कसा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी, 16 नोव्हेंबर रोजी दादर परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यास दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
शिंदे गटाचा आरोप काय?
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.
ठाकरे गटाने काय म्हटले?
शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले.