(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगाड्याच्या हाडांसोबत माझा DNA मॅच झाल्याचा अहवाल खोटा, हाताने लिहिलेल्या रिपोर्टमध्ये खाडाखोड; इंद्राणी मुखर्जीचा आरोप
Sheena Bora Murder Case: मी निर्दोष, जेलमध्ये घालवलेली माझी साडेसहा वर्ष मला कोण परत देणार? असा सवाल इंद्राणी मुखर्जीने केला.
मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणी (Sheena Bora Murder case) सुरू असलेल्या खटल्यात एक धक्कादायक वळण आलंय. शीनाच्या शरीराचे अवशेष ज्यात तिच्या सांगाड्यातील जळालेली हाडं होती, तो महत्त्वपूर्ण पुरावाच CBI कडून गहाळ झालाय. विशेष म्हणजे याच कथित संगड्यासोबत शीनाच्या हत्येतील मुख्य आरोपी इंद्राणीचा DNA मॅच झाल्याचा दावा CBI नं केलाय. हा दावा इंद्राणी मुखर्जीने फेटाळला आहे. सांगाड्याच्या हाडांसोबत माझा DNA मॅच झाल्याचा अहवाल खोटा असल्याचे इंद्राणी मुखर्जीने म्हटले आहे. तसेच हाताने लिहलेल्या अहवालात खाडाखोड झाल्याचा आरोप देखील इंद्राणीने या वेळी केला आहे. इंद्राणी मुखर्जीने एबीपी माझाशी बोलताना हा खुलासा केला आहे.
इंद्राणी मुखर्जी म्हणाली, शिनाचा सांगाडा हा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे. सीबीआय कडून तो हरवला हे अत्यंत धक्कादायक आहे. शिनाची हत्या मी केली हे माझ्याच जवळच्या लोकांनी केलेलं षडयंत्र आहे. या सांगाड्यातील हाडांसोबत माझा DNA मॅच झाल्याचा अहवाल खोटा आहे. हाताने लिहिलेल्या या अहवालात खाडाखोड झाला आहे. ज्या डॉक्टरनं हा अहवाल तयार केला तो अश्याच खोट्या अहवाल प्रकरणात निलंबित झाला आहे.
राहुल मुखर्जीला ताब्यात का घेतलं नाही? इंद्राणीचा सवाल
मी निर्दोष, जेलमध्ये घालवलेली माझी साडेसहा वर्ष मला कोण परत देणार? असा सवाल इंद्राणी मुखर्जीने केला. तसेच शीना जिवंत आहे, असं माझं मन मला सांगत आहे. राहुल मुखर्जीला ताब्यात का घेतलं नाही?, त्याला कोण वाचवतयं?, याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी देखील इंद्राणीने केली आहे.
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण?
शीना बोरा (वय 24) हिची एप्रिल 2012 साली हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, शीनाची आई इंद्राजी मुखर्जी या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अनेक महिने ते तुरुंगात होती. मात्र, सध्या इंद्राणी मुखर्जीला जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे. सध्या न्यायालयाकडून शीनाच्या सांगाड्याची सर्वप्रथम तपासणी करणाऱ्या जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यक शाळेतील डॉक्टरांची साक्ष नोंदवून घेतली जात आहे. यावेळी सीबीआयकडून शीनाच्या सांगाड्याचे अवशेष न्यायालयात सादर केले जाणे अपेक्षित होते. त्याआधारे फॉरेन्सिक तज्ज्ञांची साक्ष नोंदवून घेतली जाणार होती. मात्र, आता हे अवशेष मिळत नसल्याची माहिती सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे शीनाच्या सांगाड्याचे अवशेष नेमके गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.