शरद पवारांची मध्यस्थी आणि शिवसेनेची मनधरणी
मुंबईतल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमुळे शिवसेना नाराज होती आणि बदल्या रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी नाराज झाली, म्हणून शरद पवार यांनी मध्यस्थी करत उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची भेट घडवून आणली.
मुंबई : शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी काल (6 जुलै) मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल एक तास चर्चा झाली आणि या बैठकीत एकमेकांबद्दल झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचं कळतंय. मुंबईत नुकत्याच झालेल्या पोलीस दलाच्या बदल्यांवरुन महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचं सर्वांसमोर उघड झालं. मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांनी बदल्या केल्या पण त्या काहीच दिवसांत रद्द करण्यात आल्या. त्यानंतर या बदल्या का रद्द केल्या? बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे बदल्यांमुळे शिवसेना नाराज होती आणि बदल्या रद्द केल्यामुळे राष्ट्रवादी नाराज झाली म्हणून शरद पवार यांनी मध्यस्थी करत उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची भेट घडवून आणली.
भेटीत काय घडलं? शरद पवार यांनी या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना समोरासमोर बसवून गैरसमज दूर केले. मुंबईतल्या बदल्या रद्द केल्याने शिवसेना चांगलीच संतापली होती. गृहखातं राष्ट्रवादीकडे असताना मुंबईतले जे काही बदल असतील ते शिवसेनेला विश्वासात घेऊन करावे, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. तर पोलीस आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला आहे असं वाटल्याने या बदल्यांना हिरवा कंदील दिल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. तसंच यापुढे कोणत्याही बदल्या करण्याआधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जाईल अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.
अजित पवारांबद्दल नाराजी या मुद्द्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आपण चुकीचा संदेश बाहेर देत आहोत. महाविकास आघाडी म्हणून काम करताना असे पक्षप्रवेश करणं चुकीची असल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीआधीच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांना पाच नगरसेवक परत शिवसेनेत पाठवा, असा मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला होता. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेताना शिवेसेनेशी संवाद का साधाला गेला नाही? असा सवाल शिवसेनेने विचारला.
मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांची बैठक मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई पोलीस कमिश्नर परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली. या बैठकी मातोश्रीवर काय काय घडलं तसंच पुढे काम करताना शिवसेनेशी कसा समन्वय ठेवायचा आहे याबाबत चर्चा झाली.
सरकार स्थापन झाल्यापासून या तीन पक्षांमध्ये अनेकवेळा खटके उडाले आहेत. पाहूया आतापर्यंत काय काय घडलं आहे?
1. खाते वाटपावरुन मंत्रिमंडळाला उशीर
2. सावरकरांच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांची राहुल गांधींवर टीका
3. अब्दुल सत्तार, विजय वड्डेटीवार, छगन भुजबळ मंत्रिपदावरुन नाराज
4. भीमा कोरेगांवचा तपास NIA दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज (मल्लिकार्जुन खर्गेनी आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती )
5. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शाह आणि सोनिया गांधीची भेट घेतली त्यानंतर CAA वर जाहीर केलेल्या भूमिकेवरून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि संजय निरुपम यांनी टीका केली होती.
6. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षण जाहीर केलं त्यानंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती
7. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेच्या रिंगणात असताना काँग्रेसचा अधिक एका जागेचा आग्रह होता, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता.
8. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु दोघांचाही 5 जागांचा आग्रह
9. लॉकडाऊन वाढवल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस नाराज
10. मुंबईतल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत खटके उडाले
संबंधित बातम्या
- महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही : खासदार प्रफुल्ल पटेल
- शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात 3 तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई पोलीस उप आयुक्तांच्या बदल्या रद्द?
- मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या गोंधळातून मुख्यमंत्री-मंत्र्यामधील अविश्वास उघड : देवेंद्र फडणवीस
- Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी
- Pawar, Thackeray | पवार-ठाकरे बैठकीत काय घडलं?