एक्स्प्लोर
Advertisement
शक्ती मिल गँगरेप प्रकरणी फाशीची शिक्षा योग्यच, हायकोर्टात केंद्र सरकारचं उत्तर
या प्रकरणांमध्ये पीडितेच्या मनावर होणारा आघात लक्षात घेता गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षाच योग्य आहे. त्यामुळे शक्ती मिल प्रकरणात दोषींना दिलेली फाशीची शिक्षा ही योग्यच असल्याचा दावा केंद्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.
मुंबई : बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्याची संख्या कमी करण्यासाठी कठोरातील कठोर शिक्षेचं प्रावधान करणं आवश्यक आहे. या प्रकरणात आजही पीडित सहसा गुन्हा नोंदवण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब बसवणं आवश्यक आहे, असं मत केंद्र सरकारने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना व्यक्त केलंय.
या प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडताना अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हायकोर्टाला सांगितलं की, कलम 376 मध्ये सुधारणा करताना ही फाशीची शिक्षा काही नव्यानं आणलेली नाही. त्याची तरतूद मुळातच त्यात होती. केवळ या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणाऱ्यांसाठी ती तातडीने लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आणि ती लागू करताना दोन गुन्ह्यातील काळावर अशी कोणतीच मर्यादा नाही. तसेच या प्रकरणांमध्ये पीडितेच्या मनावर होणारा आघात लक्षात घेता गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षाच योग्य आहे. त्यामुळे शक्ती मिल प्रकरणात दोषींना दिलेली फाशीची शिक्षा ही योग्यच असल्याचा दावा केंद्र सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.
मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने कलम 376 (ई) या कायद्यात सुधारणा करत संबधित आरोपीने दोन वेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावू शकतो, अशी तरतूद करण्यात आली आहे. कायद्यातील या सुधारणेलाच तिघांनी या याचिकेतून आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे यासंदर्भातील याचिकेवर गुरुवारीही सुनावणी सुरु राहील.
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement