![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाहतूक पोलीस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा
2016 मध्ये खार येथे विनाहेल्मेट पकडलं म्हणून पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपी अहमदअली मोहम्मद कुरेशीला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेसोबत कुरेशीला न्यायालयाने 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. ज्यातील 45 हजार रुपयांची रक्कम शहीद विलास शिंदे यांच्या पत्नीला देण्याचे निर्देश दिले आहेत.
![वाहतूक पोलीस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा Sessions court granted Life sentence to accused who killed cop in road rage वाहतूक पोलीस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/29192636/vilas-shinde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची खार येथे 2016 मध्ये मारहाण करुन हत्या करणारा आरोपी अहमद मोहम्मदअली कुरेशी याला शनिवारी मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ नाही, त्यामुळे आरोपी हा फाशीस पात्र नाही. मात्र आरोपीने आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून त्याची हत्या केली आहे. त्यामुळे तो कठोर शिक्षेस नक्कीच पात्र आहे. अशा आरोपीवर दया दाखवली तर समाजात चुकीचा संदेश जाईल. असं मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आपल्या निकालात स्पष्ट केलं. जन्मठेपेसोबत कुरेशीला न्यायालयाने 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. ज्यातील 45 हजार रुपयांची रक्कम शहीद विलास शिंदे यांच्या पत्नीला देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारने त्यांच्याकडील उपलब्ध अनुकंपा योजनेनुसार शिंदे कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे निर्देशही दिले आहेत. शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची विधवा पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. विलास शिंदे यांना राज्य सरकारने शहिदाचा दर्जा दिलेला असून त्यांचा मुलगा दिपेश शिंदे यालाही मुंबई पोलीस दलात नोकरी मिळाली आहे.
कशी घडली होती घटना?52 वर्षीय वाहतूक पोलीस विलास शिंदे 23 ऑगस्ट 2016 रोजी एस. व्ही. रोड, खार येथे आपलं कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक अल्पवयीन तरुण विनाहेल्मेट आणि विनापरवाना दुचाकीवर आला. शिंदे यांनी या तरुणाकडे हेल्मेट नसल्याबाबत विचारणा करत लायसन्सची मागणी केली. मात्र त्या मुलाने मोबाईलवरुन भावाला फोन केला आणि त्याला घटनास्थळी येण्यास सांगितलं. आरोपी अहमदअली हा घटनास्थळी आल्यावर त्याने शिंदे यांच्याबरोबर जोरदार वादावादी झाली, ज्याचं रूपांतर बाचाबाचीत झालं. हा वाद सुरू असतानाच अचानक अहमदअलीनं बाजूला पडलेला बांबू उचलून शिंदे यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यातला एक घाव शिंदेंच्या वर्मी बसला आणि शिंदे खाली कोसळले. त्यानंतरही अहमदअलीसह त्याच्या अल्पवयीन भावाने शिंदेंवर बांबू आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. शिंदे निपचित पडल्याचं लक्षात येताच हे दोघे त्यांच्या दुचाकीची चावी घेऊन पळून गेले.
या घटनेच्या तीन दिवसांनी शिंदे यांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी वाहतुकीचे नियम मोडणे, जबर मारहाण, चोरी आणि हत्येच्या आरोपाखालील कलम लावत खटला चालवला. अखेर तीन वर्षांनी मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशोर जैयस्वाल यांनी आरोपील शुक्रवारी कलम 301 अंतर्गत हत्येसाठी दोषी जाहीर केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी घटना घडली, तेव्हा अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावरील खटला अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती तपास अधिकारी राजेंद्र काणे यांनी दिली. मात्र खटल्यातील दुसरा आरोपी आता सज्ञान असल्यामुळे त्याच्याविरोधात स्वतंत्र खटला चालवण्यात येईल. बालहक्क न्यायालयानंही याबाबत सहमती दिलेली आहे. बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या अल्पवयीन आरोपींसाठी कायद्यामध्ये काही विशेष तरतुद केलेली असल्यानं त्यांना दोषी ठरल्यानंतरही कठोर शिक्षा देता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)