Vishwas Mehendale : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vishwas Mehendale : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vishwas Mehendale : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचं निधन झालं असून वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही (Maharashtra News) काम केलं आहे. विश्वास मेहंदळे वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेतेही होते. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासोबतच 18 हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे.
ज्येष्ठ माध्यमकर्मी अशी ओळख असणारे विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. तसेच, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. 'सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन'चे ते संस्थापक होते.
दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक
विश्वास मेहेंदळे यांची मीडियासंबंधी कारकीर्द वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. डॉ. विश्वास मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक होते. दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. तसेच, मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिलं. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते.
उत्तम नट, लेखक अन् अभिनेते
विश्वास मेहेंदळे हे मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार आहेत. 'मला भेटलेली माणसे' हा एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. याव्यतिरिक्त अग्निदिव्य, एकच प्याला, एक तमाशा अच्छा खासा, खून पहावा करून, जर असं घडलं तर, नांदा सौख्यभरे, पंडित आता तरी शहाणे व्हा, प्रेमा तुझा रंग कसा यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये मेहेंदळे यांनी भूमिका साकारल्या होत्या.
सृजन फाउंडेशननं महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पुण्यात 1-3 ऑक्टोबर 2010 या काळात भरविलेल्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी भूषवलं होतं. तसेच, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून 'मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार' पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.