'पोटदुखी, जळजळ होणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील' : संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Rally) यांच्या होणाऱ्या सभेआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut On Today Shiv Sena Rally : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Rally) यांच्या होणाऱ्या सभेआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचे आयोजन केलं आहे. महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं की, आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे, असं ते म्हणाले. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असं राऊत म्हणाले.
केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टबाबत संजय राऊत म्हणाले की, काही व्यक्ती या हिमालयाएवढ्या असतात. सूर्यावरती थुकलं की सूर्याचं महत्व कमी होत नाही. ही नशेबाज लोक आहेत. यांना एक वेगळ्या प्रकारची नशा घडवलेली आहे, दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात. खिडकी उघडली की ते हवेबरोबर वाहून जातील, असं त्यांनी म्हटलं
राऊत पुढे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होतेच आणि राहणार आहेत. हिंदू जननायक कोण महानायक कोण हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं ते म्हणाले.
काँग्रेसच्या नवसंकल्प सभेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, त्यांची भूमिका चांगली आहे, काँग्रेस पक्षाने हालचाल करून हळूहळू वर यायला पाहिजे. त्यामुळे देशाला परिवर्तनाची आशा आहे, असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
इतर काही महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
