(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या BKCवरील आजच्या सभेची जय्यत तयारी; वाहतूक मार्गात मोठे बदल
CM Uddhav Thackeray Shiv Sena Rally At BKC : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. सभेआधी या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
CM Uddhav Thackeray Shiv Sena Rally At BKC : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. भोंगा. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.
या सभेसाठी एमएमआरडीए मैदानावर मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
वाहतूक बंद असलेले मार्ग
वरळी सी लिंकवरून कुर्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस भारत नगर जंक्शनवरून कुर्ल्याकडे जाण्यास प्रतिबंध असेल.
संत ज्ञानेश्वर नगरकडून येणारी आणि कुर्ल्याकडून भारत नगर जंक्शनने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असेल.
खेरवाडी शासकीय वसाहत, कनकिया पॅलेस, यूटीआय टॉवर आणि चुनाभट्टी येथून कुर्ल्याच्या दिशेने येणारी वाहने प्रतिबंधित असतील.
कुर्ला आणि रज्जाक जंक्शनवरून पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वरळी सी लिंककडे जाणारी वाहनांची वाहतूक एमटीएनएल जंक्शनपासून भारत नगर जंक्शनकडे जाण्यासाठी प्रतिबंधित असेल.
पर्यायी रस्ते
1 : भारत नगर जंक्शनपासून वाहनांची वाहतूक पुढील अशी असेल: सेबी जंक्शनवरुन उजवीकडे वळण घेऊन वन बीकेसी जंक्शनवरून उजवे वळण घ्यायाचे आहे. त्यानंतर कॅनरा बँकेपासून डावीकडे एमसीए क्लब जंक्शन कडे जावे लागेल. तेथून अमेरिकन कॉन्सुलेट जंक्शन-टाटा, संप्रेषण डावीकडे वळून MTNL जंक्शनवरून कुर्ल्याकडे जाईल.
2 : भारत नगर जंक्शनपासून वाहनांची वाहतूक : सेबी जंक्शनवरुन उजवे वळण घेऊन नंतर वन बीकेसी जंक्शनपासून उजवे वळण घ्यावे लागेल. नंतर कॅनरा बँक जंक्शनपासून डावीकडे MCA क्लबकडे वळा. अमेरिकन कॉन्सुलेट जंक्शन-टाटा कम्युनिकेशन डावीकडे वळण- येथून MTNL जंक्शन-रज्जाक जंक्शन-मुंबई विद्यापीठ-हंस भुग्रा जंक्शन डावीकडे वळण.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून पुढे जावून खेरवाडी सरकार कॉलनी- खेरवाडी वांद्रे पूर्व मुंबई.
3 : MTNL जंक्शन ते टाटा कम्युनिकेशन, उजवे वळण घेऊन अमेरिकन कॉन्सुलेट
जंक्शन- MCA क्लब-कॅनरा बँक जंक्शन-NSC जंक्शन डावीकडे वळण, पश्चिमेकडे एक्सप्रेस हायवे, धारावी आणि वरळी सी लिंक रोडला जावे लागेल. ही वाहतूक उद्या म्हणजे 14 रोजीसाठी असेल.