Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवरची सुनावणी वेळेअभावी पुढे ढकलली, उद्या होणार सुनावणी
Sanjay Raut Granted Bail: खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या याचिकेवर आता उद्या, शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार होती.
ईडीचा युक्तीवाद काय?
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोर्टाने ईडीला झापलं
गुरुवारी संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापलं आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक कऱण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक कऱण्यात आली. यात ईडीच्या बाजूने आरोपी पिक अँड चूज केल्याचं दिसतंय. जर कोर्टाने इ़डी आणि म्हाडाचं म्हणणं मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल. सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल.
शिवसेनेचे 103 आमदार निवडून आणणार
तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी गुरुवारी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ते म्हणाले की, "मला याच रस्त्यावरुन अटक करुन घेऊन गेले होते. त्यावेळीही मी सांगितलं होतं, की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. या पुढे महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना राहिल. मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, आता शिवसेनेचे 103 आमदार निवडून आणणार. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही. लोकांनी माझं 100 दिवसांनाही स्मरण ठेवलं, त्यांनी जल्लोष केला. हे माझं स्वागत नसून शिवसेनेचं स्वागत आहे. यापुढे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा पक्षासाठी देणार. आता रडायचं नाही तर लढायचं."