![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanjay Raut Bail: संजय राऊत यांना अटक ते सुटका... असा आहे घटनाक्रम
Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप ठेवून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांना जामीन मिळाला.
![Sanjay Raut Bail: संजय राऊत यांना अटक ते सुटका... असा आहे घटनाक्रम Sanjay Raut Bail chronology PMLA Court granted bail to sanjay raut in Patra Chawl Land Scam Maharashtra Marathi news Sanjay Raut Bail: संजय राऊत यांना अटक ते सुटका... असा आहे घटनाक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/bd23c0b3cdf9ac5689da0c18a1bf239f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी संजय राऊत अटकेत होते. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ईडीने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
संजय राऊत यांची अटक ते जामीन या प्रवासाची क्रोनोलॉजी अशी आहे,
संजय राऊतांच्या पत्नींना ईडीची समन्स
27 डिसेंबर 2020 रोजी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पहिले समन्स पाठविले. त्यानंतर 4 जानेवारी 2022 रोजी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ईडीकडून साडेतीन तास चौकशी करण्यात आली. 11 जानेवारी 2022 रोजी वर्षा राऊत यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले.
प्रवीण राऊत यांना अटक
2 फेब्रुवारी 2022 रोजी पत्रावालाचाळ प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली.
संजय राऊतांची संपत्ती जप्त
5 एप्रिल 2022 रोजी ईडीने संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केली. 27 जून 2022 रोजी संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. 28 जून 2022 ला राऊतांनी वकिलांमार्फत 7 ऑगस्टपर्यंत ईडीकडे हजर राहण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी मुंबईतील कार्यालयात संजय राऊतांची दहा तास चौकशी झाली. नंतर 27 जुलै 2022 रोजी संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. परंतु, राऊत चौकशीला गैरहजर राहिले.
संजय राऊतांची नऊ तास चौकशी
31 जुलै 2022 रोजी सकाळी सात वाजताच ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना चार वाजता ईडीने ताब्यात घेतले आणि नंतर रात्री 11.38 मिनिटांनी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
आठ दिवसांची ईडी कोठडी
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.
तुरुंगात मुक्काम वाढला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती.
संजय राऊत यांची कोठडी 14 दिवसांनी वाढवली
19 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली. संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
दिवाळी तुरुंगातच
संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी होऊन त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच गेली.
न्यायालयानं जामीन अर्जावर सुनावणी राखून ठेवली, निर्णय 9 नोव्हेंबरला
राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने 2 नोव्हेंबर रोजी लेखी उत्तर सादर केले. त्यानंतर जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.
... आणि अखेर सुटका
न्यायालयाने आज म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीनावर सुनावणी घेत त्यांना जामीन मंजूर केला. संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)