जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक; सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचना
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम किंवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याची माहिती शासनाकडून वेळोवेळी दिली जात आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग शिवाय स्वच्छता राखण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून केलं जात आहे. मात्र एक पाऊल पुढे जात काही संस्थांनी निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर सुरु केला होता. मात्र अशी जंतुनाशक फवारणी अपायकारक ठरू शकते, असं केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम किंवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो. म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळवले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालकांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
संबंधित बातम्या