एक्स्प्लोर
Advertisement
'सामना'तील वादग्रस्त कार्टूननंतर सेना नेत्यांच्या मनात काय खदखदतंय?
मुंबई : शिवसेनेची भूमिका मराठा विरोधी नाही. तसंच माफीनाम्यामुळे व्यंगचित्राच्या वादावर पडदा पडल्याचं शिवसेना खासदार प्रताप जाधवांनी म्हटलं आहे. शिवसेना नेत्यांच्या कथित राजीनाम्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेड राजाचे आमदार शशिकांत खेडेकर आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांना मातोश्रीवर भेटीसाठी पाचारण केलं आहे.
व्यंगचित्रानंतर या तिन्ही मराठा नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याच्या बातम्या एकाएकी पसरल्या होत्या. त्यामुळे पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट नेत्यांना पाचारण करुन वातावरण निळवण्याचा प्रयत्न केला आहे.
"मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शिवसेना गंभीर"
शिवसेनेनं राजीनाम्याच्या बातम्यांना नकार देत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शिवसेना गंभीर असल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नेत्यांची बैठक झाली. ज्यात 'सामना'त आलेल्या या व्यंगचित्राबद्दल सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याची भावना नेत्यांनी बोलून दाखवली.
खासदार प्रतापराव जाधव काय म्हणाले?
"पराचा कावळा करुन काही लोक बातम्या पसरवत आहेत. सोशल मीडियातून राजीनाम्याच्या गोष्टी चालवल्या जात आहेत. व्यंगचित्राचं निमित्त करुन विरोधक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.", असे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.
मराठा मोर्चात शिवसेना नेते सहभागी : प्रतापराव जाधव
सामाजिक बांधिलकी म्हणून मराठा मोर्चांमध्ये शिवसेनेचे नेते, कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. मोर्चाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही, असेही प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठा नेत्यांवर निशाणा
"समाजाच्या दाबावाखाली काही लोक मोर्चात सामील होत आहेत. मात्र, शिवसेना कुठल्याही दबावाखाली नाही. शिवसेनेतील नेते सर्वसामान्य मराठा समाजातून आले आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रतिष्ठित मराठा समाजातून आले आहेत", असे म्हणत प्रतापराव जाधवांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यावंर निशाणा साधला.
“...मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांचा विषय संपलेला नाही!”
व्यंगचित्र वादावर प्रतापराव जाधव म्हणाले, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंनी माफी मागितली आहे. त्यामुळे व्यंगचित्र वादाचा विषय संपला आहे. मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांचा विषय संपलेला नाही, असेही प्रतापराव जाधव म्हणाले.
वादग्रस्त व्यंगचित्र आणि दगडफेक
मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी ‘सामना’ पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.
व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंकडून दिलगिरी
‘सामना’त श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी लिहिलं आहे की, “सामनाच्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
“व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो व त्या सदराचे नाव म्हणूनच ‘हसोबा प्रसन्न’ आहे.
25 सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो. या सर्व प्रकरणाचे राजकारण झाले व त्यात ‘शिवसेना’ व ‘सामना’स ओढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्यामुळेच हा खुलासा करीत आहे.”
‘सामना’च्या ऑफिसवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
नवी मुंबईतील वाशी इथल्या सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीकृष्ण सावंत, अमोल जाधवराव, मनोज आखरे, पुरूषोत्तम खेडकर अशी या चौघांची नावं आहेत. हे चारही जण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत. वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे. या प्रेसवरच काल या चारही तरुणांनी हल्लाबोल केला होता. तिकडे ठाण्यातील कार्यालयावरही शाईफेक करण्यात आली.
चुकीला माफी नाही : नितेश राणे
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांच्यावर संसदेचं वादग्रस्त व्यंगचित्र काढल्याप्रकरणी अटकेची कारवाई होऊ शकते, मग संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई का नाही? असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. शिवाय, चुकीला माफी नाही, असे म्हणत सेनेवर निशाणा साधला आहे.
‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्र वादावर काल एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’मध्ये चर्चा झाली. पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी
सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा
व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना
उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील
‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र
‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे
‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक
कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे
मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, पण.. : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
भारत
बॉलीवूड
Advertisement