(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जावेद अख्तर यांच्याविरोधात ठाणे कोर्टात एक रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा, RSS ची तुलना तालिबानशी केल्याची तक्रार
RSS कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांच्या अब्रुनुकसानीच्या याचिकेवर गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना 12 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
ठाणे : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संदर्भ जोडत कथित वादग्रस्त विधान करणारे गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या विरोधात एकापाठोपाठ एक अब्रुनुकसानीचे दावे दाखल होत आहेत. ठाणे कोर्टानं अशाच एका प्रकरणात जावेद अख्तर यांना 12 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी हा दावा दाखल करत अख्तर यांच्याकडून एक रूपया मनहानी वसूल करण्याची मागणी केली आहे. अशाच प्रकारे मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयातही एका वकिलाने अख्तर यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामुळे अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (One rupee defamation suit filed against Javed Akhtar in Thane court).
तालिबानमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर जगभर त्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशातच अख्तर यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात मत व्यक्त करताना आरएसएसचा उल्लेख केला होता. ज्यात त्यांनी तालिबानी आणि आरएसएस एकसमान असल्याच्या आशयाची कथित तुलना केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात अॅड. ध्रुतीमन जोशी यांनी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्याच धर्तीवर आता ठाणे मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातही दावा दाखल करण्यात आला आहे.
जावेद अख्तर यांनी तालिबानची तुलना आरएसएसबरोबर केली आहे. संघाची विचारसरणी तालिबानी सारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण करते, असंही अख्तर यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आहे. यामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा आरोप या याचिकांतून केलेला आहे. दरम्यान, या विधानांवरुन जावेद अख्तर यांना अन्य एक वकील संतोष दुबे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्यात हे विधान मागे घेण्याची मागणी केलेली आहे. यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या :