(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंगनाला कोर्टावर भरवसा नाय... अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील मानहानीचा खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टार सोबतच्या तिच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली होती.
मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अखेर अभिनेत्री कंगना रनौत सोमवारी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर झाली. कंगनाच्यावतीनं तिच्याविरोधात तक्रार दाखल करणा-या जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीची तक्रार कोर्टाला दिली गेली. मात्र या कोर्टावर आता आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत ही सारी प्रकरणं दुस-या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज कोर्टापुढे सादर केला. आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी धमकी देण्यात येते, असा आरोप कंगनानं या अर्जातून केला आहे. कोर्टानं या अर्जाचा स्वीकार केला असून जोपर्यंत मुख्य दंडाधिकारी न्यायाधीश यावर निकाल देत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाला स्थगिती देत सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. मुख्य दंडाधिकारी यावर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे.
यावेळी कंगनाच्यावतीनं अॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्यावतीनं कोर्टाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र याला अख्तर यांचे वकील भारद्वाज यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रत्येकवेळी नव्या सबबी सांगून निव्वळ कोर्टाचा वेळ फुटक घालवला जात असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. तसेच कंगनानं जावेद अख्तर यांच्याविरोधात अचानक दाखल केलेल्या या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टार सोबतच्या तिच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली होती. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं आपल्यावर केले आहेत. यामुळे आपली विनाकारण बदनामी झाली असून आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यामुळे कंगनावर मानहानीचा फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रनौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र त्यानंतरही कंगना सातत्यानं गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं पुन्हा अटक वॉरंट जारी करण्याची तंबी दिली होती.