आरपीएफ अधिकारी आणि तीन प्रवाशांची हत्या; आरपीएफ जवानाच्या व्हायरल व्हिडीओबद्दल काय म्हणाले पोलीस?
RPF Constable Shoots : आरपीएफ अधिकारी आणि प्रवाशांची हत्या केल्यानंतर आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर रेल्वे पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
RPF Constable Shoots : महाराष्ट्रातील पालघर रेल्वे स्थानकाजवळ (Palghar Railway Station) रेल्वे सुरक्षा दलाच्या एका हवालदाराने सोमवारी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची आणि दोन बोगीतील तीन प्रवाशांची आणि जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Central Express) हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. आरोपी आरपीएफ जवानाला (RPF Constable) अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांची हत्या केल्यानंतर आरोपी चेतन सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर रेल्वे पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग (34) याने आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिका राम मीना आणि B5 कोचमधील अन्य एका प्रवाशाला त्याच्याजवळील स्वयंचलित शस्त्राने गोळ्या घालून ठार केले. त्याने B6 कोचमधील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घालून ठार मारले. त्याशिवाय, B5 आणि B6 डब्यांच्या दरम्यान असलेल्या पॅन्ट्री कारमधील आणखी एकाची हत्या केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. पालघरमध्ये गोळीबार केल्यानंतर मीरा रोड आणि दहिसर दरम्यान प्रवाशांनी साखळी खेचली आणि एक्स्प्रेस थांबवली. त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी चेतन सिंहला रेल्वे पोलिसांनी पकडले. अब्दुल कादिरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (48), अख्तर अब्बास अली (48) आणि सदर मोहम्मद हुसेन अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी (गुजरात) स्थानक ओलांडल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहने आपला वरिष्ठ अधिकारी टिका राम मीणा यांच्यावर गोळीबार केला आणि ट्रेनच्या वेगवेगळ्या बोगीत आणखी तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या, असे रेल्वे पोलिस (जीआरपी) आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माध्यमांना सांगितले. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. अद्यापही तपास सुरू आहे. पोलिसांकडून प्रवाशांची, आरपीएफचे कर्मचारीआणि पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मीरा रोड आणि दहिसर स्थानकांदरम्यान सकाळी 5.50 ते सहा वाजण्याच्या सुमारास साखळी ओढल्यानंतर आरोपी सिंगने ट्रेनमधून उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडण्यात आले.
त्या व्हिडीओबद्दल काय?
आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंहने प्रवाशांना ठार केल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या कृत्याबाबत आरोपी आरपीएफ सिंह भाष्य करताना दिसत आहे. 'अल्ट न्यूज'चे मोहम्मद झुबेर यांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट करत त्यातील सिंहचे संभाषण नमूद केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आपली चिंता व्यक्त केली.
The RPF constable Chetan Singh, Standing infront of dead body of Muslim man after shooting him says,
— Mohammed Zubair (@zoo_bear) July 31, 2023
“Pakistan se operate hue hain, tumhari media, Yahi desh ki media ye khabrein dikha Rahi hai, Pata chal raha hai unko, sab pata chal raha hai, inke aaqa hai wahan. Agar XXXXX hai,… pic.twitter.com/Tcl9m9TArF
मृतदेहाजवळ आरोपी हवालदार हजर असल्याचे दाखविणाऱ्या आणि हत्येचे औचित्य सिद्ध करणाऱ्या व्हिडिओबाबत जीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, व्हिडिओ क्लिपसह इतर बाबींचीही तपासणी केली जात आहे. तपासाच्या या टप्प्यावर कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे खूप घाईचे ठरले असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू असून जे पुरावे, गोष्टी समोर येतील, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल सिंहने त्याच्या स्वयंचलित शस्त्राने 12 राऊंड फायर केले. या घटनेनंतर जीआरपीने त्याच्या स्वयंचलित शस्त्रामधून आठ गोळ्या जप्त केल्या आहेत. सिंह हा उत्तर प्रदेशातील हाथरसचा असून तो मीरा रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी पीटीआयला सांगितले की, आरोपी हवालदार हा लोअर परळ आरपीएफ ठाण्यात कार्यरत होता. तर एएसआय टिका राम मीना दादर आरपीएफमध्ये होते. गोळीबाराच्या घटनेनंतर B5 आणि B6 डब्यातील बहुतेक प्रवासी बोरिवली स्टेशनवर उतरले. आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ASI मीना या राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील होते. 2025 मध्ये सेवेतून निवृत्त होणार होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हवालदाराची गेल्या मार्चमध्ये भावनगर विभागातून मुंबईत बदली झाली होती आणि अलीकडेच तो त्याच्या मूळ गावी हाथरसला गेला होता. 17 जुलै रोजी तो ड्युटीवर रुजू झाला.