मुंबईतले रस्ते आता प्लास्टिकचे होणार
मुंबईतील रस्ते आता प्लास्टिकचे होणार आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या निर्मितीत डांबराच्या मिश्रणामध्ये प्लास्टिक कचर्याचा वापर करणे बंधनकारक केलं आहे.
मुंबई : मुंबईतले रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. नेहमी खड्ड्यांसाठी चर्चेत असलेले मुंबईतले रस्ते आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत येणार आहे. आश्चर्यचकित होऊ नका, कारण खड्डेमुक्त मुंबई करण्याच्या दृष्टीनं हा एक नवा प्रयोग करुन बघायचं मुंबई महापालिकेने ठरवलं आहे. त्यामुळे यापुढे रस्त्यांच्या कामामध्ये डांबरासोबतच प्लास्टिकचा कचरा सुद्धा मिसळला जाणार आहे.
प्लास्टिकच्या वापरानंतर रस्ते खड्डेमुक्त, गुळगुळीत होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही त्यावर वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे मुंबईतील रस्ते प्लास्टिक कचर्यापासून बनवण्याची मागणी नगरसेवकांकडून होत होती. अखेर ही मागणी प्रशासनाने मान्य करत सर्व रस्त्यांच्या कामांमध्ये पुढील महिन्यापासून डांबराच्या मिश्रणामध्ये प्लास्टिक कचर्याचा वापर करणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक कचर्याचा वापर रस्ते कामांमध्ये केला जाणार असल्याने मुंबईचे रस्तेही प्लास्टिकमुळे तुळतुळीत आणि मजबूत होणार आहेत.
मुंबईत दीड वर्षांपूर्वी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्या आणि साठा करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबवण्यात आली. त्याअंतर्गत मुंबईतील दुकाने, मार्केट तसेच शॉपिंग सेंटर व मॉल्समधील गाळेधारकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत हजारो किलो जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान मुंबई महापालिकेकडे आहे. शिवाय, यापूर्वी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी नसल्याने अनेक प्लास्टिक पिशव्या या कचर्यामध्ये जमा झालेल्या आहेत. त्याने पर्यावरणाला हानी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक कचर्याचा वापर करून रस्ते बनवण्याची मागणी जून 2016 मध्ये तत्कालिन काँग्रेसचे नगरसेवक राम आशिष गुप्ता यांनी केली होती.
त्यानुसार रस्त्यांच्या बांधकामामध्ये डांबर मिश्रणात प्लास्टिक कचर्याचा वापरासंदर्भातील इंडियन रोड काँग्रेसच्या विशिष्ट नियमावलीमधील मार्गदर्शक तत्वे आणि तांत्रिक तपशील यानुसार 15 फेब्रुवारीपासून बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या नोंदणीकृत असलेल्या सर्व अस्फाल्ट प्लांटधारकांनाही प्लास्टिक कचर्याच्या वापर करून डांबर मिश्रण बनवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये पिशव्या, दुधाच्या पिशव्या, बीन लायनिंग, सौदर्यप्रसाधन वस्तूंची आवरणे, शॅम्पो बॉटल्स, बाटल्याची झाकणे, घरातील टाकावू प्लास्टिकच्या वस्तू या प्लास्टिक कचर्याचा वापर होणार आहे.