जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी
सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी या प्रकणाचा निषेध करत जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे ही अतिशय गंभीर घटना आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका व्यक्तीने केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. याबद्दल मला माहिती नाही. रात्री मी झोपलेला असतो. त्या दिवशी देखील मी दिवसभर माझ्या विभागात काम केल्यामुळे घरी येऊन झोपलो होतो, असं आव्हाडांनी सांगितलं. याउलट डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर माझ्या घराची रेकी करण्यात आली होती. त्या रेकीच्या वेळी आणि दाभोळकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षपणे या तरुणाचा हात असल्याचा दाट संशय आहे. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली होती, तशी पोस्ट कोण सहन करणार नाही. माझा नग्न फोटो या मुलाने टाकला होता, असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? तसेच हे भाजपचे नेते तरी सहन करतील का? अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी 'एबीपी माझा' ला दिली आहे.
काय आहे प्रकरण आणि पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लावण्याचं आवाहन केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर अनंत करमुसे या कासारवडवली येथे राहणार्या तरुणाने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का? यासोबत जितेंद्र आव्हाड यांचं एक अश्लील चित्र देखील फेसबुकवर या तरूणाने पोस्ट केले होते. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रविवारी रात्री दोन पोलीस या व्यक्तीच्या घरी आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला यावं लागेल असं सांगत गाडीत बसवून थेट जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील 'नाद' बंगल्यावर घेऊन आले, असं या व्यक्तीने सांगितंल. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट का केली यासंदर्भात प्रश्न विचारले. तरुणाच्या म्हणण्यानुसार प्रचंड मारहाण झालेली असताना त्याने जितेंद्र आव्हाड यांची माफी मागितली आणि त्यांच्या सांगण्यावरून ती पोस्ट डिलीट केली. मात्र तरीही पुन्हा आव्हाड यांच्यासमोर त्याला मारहाण करण्यात आली असं तरुणाने आरोप केला आहे. त्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना बोलावून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र पोलिसांनी तरुणाची अवस्था बघून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी केली. यामध्ये त्याला जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर तरुणाने अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी देखील या तरुणाच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.