Rajya Sabha Election: शिवसेनेच्या दोन्ही 'संजय'चा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार उपस्थित
Rajya Sabha Election : शिवसेनेच्या संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार उपस्थित होते.
![Rajya Sabha Election: शिवसेनेच्या दोन्ही 'संजय'चा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार उपस्थित rajya sabha election 2022 Shivsena candidates Sanjay raut and Sanjay pawar filed nomination in presence of cm Thackeray and sharad pawar Rajya Sabha Election: शिवसेनेच्या दोन्ही 'संजय'चा उमेदवारी अर्ज दाखल; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/26/adc1fb73b7641b0065cae433e93ebdea_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. सध्या विविध पक्षीय बलानुसार भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. तर उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. या सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते. या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून मला निवडून द्यावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली होती. तर, शिवसेनेने त्यांना पक्षात प्रवेश करून उमेदवारी स्वीकारण्याची गळ घातली होती. मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला. अखेर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली.
राज्यसभेतून महाराष्ट्राचे भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम हे सहा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होत आहेत.
शिवसेनेने संजय राऊत यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेत त्यांचा असलेला वाटा आणि तिन्ही पक्षांमधील वेळोवेळी समन्वयाची गरज ओळखून राऊत त्या त्या वेळी पुढे येतात. राज्यसभेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. आतापर्यंत सलग तीन वेळा संजय राऊत यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. आज चौथ्यांदा त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोण आहेत संजय पवार ?
शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. यासोबतच, सीमा प्रश्नी आंदोलनातही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)