Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह; इतिहासावर एक नजर
काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे मुंबईतील निवासस्थान राहिलेलं राजगृहाच्या परिसरात नासधूस झाली होती. त्यामुळे राजगृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यानिमित्ताने याचा इतिहासावर एक नजर.
![Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह; इतिहासावर एक नजर Rajgruha history, Rajgriha is Babasahebs knowledge house Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह; इतिहासावर एक नजर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/10021529/rajgruh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर. जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं ठरवलं. 1930 साली त्यासाठी बाबासाहेबांनी दादरला जागा विकत घेतली. पुढं बॅरिस्टरीतून कमावलेल्या पैशातून बाबासाहेबांनी घराचं काम सुरू केलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा कालखंड काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनासाठी ओळखला जातो.
1930 ला नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आंदोलन जवळपास सहा वर्षं सुरू होतं. याच काळात बाबासाहेब बौद्ध धर्माकडे आकृष्ठ होत होते. एकीकडे सत्याग्रह सुरु होता तर दुसरीकडे घराचं काम. दोन्ही जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा बाबासाहेब एका ठोस निर्णयापर्यंत पोहचले होते. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय. त्याची सुरुवात बाबासाहेबानी त्यांच्या नव्या घरापासून करायची ठरवलं. या नव्या घराला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. हे राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाशी नातं सांगणारं होतं.
Rajgruha vandalism | राजगृहाची तोडफोड करणारा व्यक्ती सीसीटीव्हीत कैद; पोलिसांकडून शोध सुरू
राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार भारतात मगध साम्राज्य जेव्हा शिखरावर होतं तेव्हा आत्ताच्या बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकानेही इथं भेट दिली होती. एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध हे देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं. अर्थात पुढं या दादरचं हे नवं राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार बनणार होतं. घराचं काम 1934 ला पूर्ण झाल्यावर बाबासाहेब रमाबाई आंबेडकरांबरोबर इथं राहायला आले. बाबासाहेबांना त्यांचे आवडते ग्रंथ व्यवस्थित ठेवता यावेत आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा उपयोग करता यावा यासाठी सोईस्कर ठरेल अशी या घराची बाबासाहेबांनी रचना करून घेतली होती.
राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बाबासाहेबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक लढ्याची सूत्रं आता या राजगृहातून हलायला लागली. पण थोड्याच कालावधीत म्हणजे मे 1935 ला रमाबाई आंबेडकरांचं इथं निधन झालं. पुढं हे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बनलं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक महत्वाच्या ग्रंथांचं लेखन इथं केलं. एनिहिलेशन ऑफ कास्ट वेटींग फॉर व्हिजा हे ग्रंथ इथंच आकाराला आले. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णयही इथंच घेतला. पुढं बाबासाहेबांचं तब्ब्ल बावीस वर्ष या राजगृहात वास्तव्य राहिलं. या राजगृहातील पुस्तकांचा संग्रह हा गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचा होता. पुढं हे राजगृह आंबेडकर कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान म्हणून ओळखलं गेलं. पण या राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद झालीय. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यावर ओरखडाही पडणं शक्य नाही.
Special Report | 'राजगृह'... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आठवणींचा साक्षीदार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)