Raj Thackeray : राज ठाकरे स्पष्टच बोलले., मला दंगल भडकवायची असती तर....
Raj Thackeray Press Conference : आम्हाला शांतता हवी असल्याचे पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. हिंसाचार भडकवायचा असता तर औरंगाबादमधील सभेत भडकावले असते असेही त्यांनी म्हटले.
Raj Thackeray Press Conference : मशिदीवरील भोंग्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपासून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा सामाजिक असून धार्मिक नाही असे म्हणत मला दंगल भडकवायची असती तर संभाजीनगरमधील सभेत भडकवली असती असे राज ठाकरे यांनी म्हटले.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. राज यांनी म्हटले की, हा सामाजिक विषय आहे, याला धार्मिक वळण जर त्यांनी दिला तर आम्हीही धार्मिक वळण देऊ. शांतता बिघडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही. संभाजीनगरमध्ये माझं भाषण सुरु असताना बांग दिली गेली, त्यावेळी हे मी पोलिसांना सांगितलं, अन्यथा भडकवायचं असतं तर तिथे काय झालं असतं सांगा? असा प्रश्ननही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांततेत सांगतो, तर पोलिसांनी आणि सरकारने ऐकून घ्यावं असं आव्हानही राज ठाकरे यांनी केले.
मौलवींचे आभार
राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकर न लावणाऱ्या मौलवींचे आभार मानले. जवळपास 90-92 टक्के ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलंं. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.
अनधिकृत मशिदींना अधिकृत परवानगी कशी?
मुंबईतील ज्या मशिदी आहेत त्यापैकी बहुतेक अनधिकृत आहेत, त्या अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी काय देता? असा सवालही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. दिवसभर जी अजान दिली जाते, बांग दिली जाते, त्या त्यावेळी आमची लोकं हनुमान चालिसा वाजवणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लोकवस्तीत 55 डिसेबिलपर्यंत मर्यादा आहे. काल नांगरे पाटलांनी मला सांगितलं परवानगी दिली आहे..माझा प्रश्न आहे, 365 दिवसाची परवानगी कशी असू शकते? आम्हाला परवानगी देताना दिवसाची देता, सणासुदीची 10-12 दिवसाची परवानगी देता.. मग यांना 365 दिवस कशी? असा सवाल राज यांनी केला.