Monsoon News : मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
Monsoon : आज पहाटे मुंबईतील अंधेरी,दादर, खार, चर्चगेट या परिसरात पाऊस झाला. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे.
Monsoon News : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर कोकणातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्राच्या इतर भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे. मात्र, पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, आज पहाटे मुंबईतील अंधेरी,दादर, खार, चर्चगेट या परिसरात पाऊस झाला. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे.
मुंबईत दडी मारलेल्या पावसाला पुन्हा आज पहाटे सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी
राज्याच्या काही भागात सुरुवातील पावसानं चांगली हजेरी लावली होती. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, पावसानं पुन्हा दडी मारली आहे. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.