'जलराणी'च्या 15 खलाशांविरोधात गुन्हा दाखल, एप्रिल फूलच्या उद्देशाने पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती दिल्याचा संशय
Coast Guard : मुंबईजवळ असलेल्या एका बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही बोट हस्तगत करण्यात आली.
Raigad Suspected Boat: 'जलराणी' मासेमारी नौकेतील 15 खलाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ONGC च्या प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 1 एप्रिल रोजी नेव्हीशी संपर्क करून नौकेत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कोस्ट गार्डने ही नौका हस्तगत करुन सर्वांना अटक केली होती. एप्रिल फूल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.
मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यापासून 55 सागरी मैलावर ही नौका हस्तगत करण्यात आली होती. ओएनजीसीच्या प्रतिबंधित क्षेत्रात नौका नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नौकेत पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच नौदलाच्या टी 16 गस्तनौकेने जलरानीला हस्तगत केलं. तपासानंतर सगळे भारतीय असल्याचं उघड झालं. मात्र चौकशीत ही मासेमारी नौका ONGC च्या प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याचं उघड झालं. एप्रिल फूल करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिल्याचा पोलिसांना संशय आहे. यलोगेट पोलीस ठाण्यात ओएनजीसीच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'जलराणी' ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.
प्रकरण काय?
1 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास एक संशयास्पद बोट आढळली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत होते. सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ही बोट नौदलाच्या हद्दीत आढळली. त्यामुळे नौदलाकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
मागील वर्षी संशयास्पद बोटीने खळबळ
मागील वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्या होत्या. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले होते. मात्र, या बोटीबाबत तपासाअंती मिळालेल्या माहितीमुळे सुटके नि:श्वास सोडण्यात आला होता.
ही बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच एका जहाजाने सुटका केली. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती देण्यात आली.
सागरी सुरक्षेतील तीन स्तर
सागरी सुरक्षा व्यवस्थेत तीन स्तर समजले जातात. यामध्ये राज्य सागरी पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल असे तीन स्तर असतात. या तिन्ही यंत्रणांची स्वत: ची हद्द असते. राज्य सागरी पोलीस किनाऱ्यापासून 22 किमी पर्यंतच्या हद्दीत काम करतात. तर, तटरक्षक दल हे 22 किमी ते 370 किमीपर्यंत काम करतात. नौदलाची मुख्य जबाबदारी ही 370 किमीपासून ते सागरी सीमेपर्यंत असते.