मलमुत्र अन् ओल्या कचऱ्यापासून बायोगँसची निर्मिती.. झोपडपट्टीतील 25 हजार कुटुंबांना मिळणार मोफत गॅस
मलमुत्र आणि ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. यातून झोपडपट्टीतील 25 हजार कुटुंबांना मोफत गॅस मिळणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
नवी मुंबई : सद्या गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी नवी मुंबईतील चिंचपाडा झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना याची चिंता नाही. कारण त्यांना मोफत बायोगँस मिळत आहे. नवी मुबंई महागरपालिकेकडून चिंचपाडा येथे बायोगॅसचा प्रकल्प उभा करण्यात आल्याने येथील रहिवशांना फूकट घरगुती गॅस मिळू लागला आहे. दुसरीकडे रस्त्यावरील लाईटही बायोगॅसवर पेटू लागली आहे. महानगरपालिकेने मलमुत्र आणि ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात राज्यात पहिली आणि देशात तिसरी आलेली नवी मुंबई महागरपालिका वेगवेगळे प्रयोग करण्यात वाकबगार आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून मनपाने देशात नावलौकिक केला आहे. अशाच पद्धतीचा अजून एक यशस्वी प्रकल्प महानगरपालिकेने ऐरोलीतील झोपडपट्टी भागात उभा केला आहे. मलमुत्र आणि ओला कचऱ्याचा वापर करून बायोगॅसची निर्मिती सुरू केली आहे. चिंचपाडा झोपडपट्टी भागातून निघणारा मलमुत्र आणि ऐरोली परिसरातील हॉटेल मधून येणारा ओला कचरा यांना एकत्र करून यातून बायोगॅस निर्मिती सुरू केली आहे. तयार झालेला बायोगॅस झोपडपट्टीतील घरांमध्ये मोफत दिला जावू लागल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिन्याला गॅस सिलेंडरसाठी हजार ते दीड हजार होणारा खर्च वाचू लागला आहे.
खासदार राजन विचारे यांचा फंड आणि खाजगी कंपन्यांकडून मिळालेल्या सीएसआर फंडातून बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला 5 टन कचर्यातून बायोगॅस आणि 300 युनिट विजेची निर्मिती केली जात आहे. यातून चिचंपाडा येथील झोपडपट्टीतील घरात मोफत गॅस कनेक्शन दिले जात असून रस्त्यांवरील विजेचे दिवे पेटवले जात आहेत. ओला कचऱ्याची जास्तीत जास्त उपलब्धता निर्माण झाल्यास आजूबाजूच्या 25 हजार घरांना मोफत घरगुती गॅस जोडणी येत्या काही महिन्यात दिली जाणार आहे. महानगर पालिकेतील प्रशासनाकडून गोळा केला जाणारा सर्व ओला कचरा या प्रकल्पासाठी द्यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक विजय चौगुले यांनी केली आहे.
महागरपालिका प्रशासनाने चिंचपाडा झोपडपट्टीत बायोगॅस प्रकल्प सुरू केल्याने अनेक पर्यावरणपुरक फायदे होवू लागवे आहेत. घरगुती गॅसची उपलब्धता, मोफत विज, ओला कचरा आणि मलमुत्राची त्याच ठिकाणी विल्हेवाट होवू लागल्याने डंम्पिंग ग्राऊंड, एसटीपी प्लांटवरील भार कमी झाला. यामुळे शहरातील प्रत्येक नोडमध्ये बायोगॅस प्रकल्प सुरू करणार असल्याचे आयुक्त अभीजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.