सिनेमाचे सबटायटल्सही सेन्सॉरच्या कात्रीत, निर्माता संघटनेची हायकोर्टात धाव
चित्रपटासह आता सिनेमाचे सबटायटल्सही सेन्सॉरच्या कात्रित सापडण्याची शक्यता आहे. याविरोधात दाद मागण्यासाठी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (आयएमपीपीए)ने हायकोर्टात धाव घेतली आहे.
मुंबई : चित्रपटासह आता सिनेमाचे सबटायटल्सही सेन्सॉरच्या कात्रित सापडण्याची शक्यता आहे. चित्रपटासह सिनेमाचे सबटायटलही सेन्सॉरकडे पाठवावे, असे आदेश केंद्रीय चित्रपट परिक्षण बोर्डाने (सीबीएफसी) चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. याविरोधात दाद मागण्यासाठी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (आयएमपीपीए)ने हायकोर्टात धाव घेतली आहे.
केंद्रीय चित्रपट परिक्षण बोर्डाच्या आदेशाविरोधात आयएमपीपीएने याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने शुक्रवारी सेन्सॉर बोर्डाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
सेन्सॉर बोर्डाने नवीन नियम तयार केले असून, चित्रपटाच्या सबटायटससाठीही आता सेन्सॉरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आयएमपीपीएला अशी नोटीस मिळाली असून चित्रपटाचे सबटायटल सेन्सॉरकडे पाठवणे हा प्रकार अहेतूक असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांनी केला आहे.
निर्मात्यांना चित्रपटासाठी प्रमाणपत्र आधी घ्यावं लागेल त्यानंतर सबटायटलचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी नव्याने प्रमाणपत्र घ्यावं लागेल. सेन्सॉर बोर्डाच्या नवीन अटी जाचक असून निर्मात्यांकडून सेन्सॉर विभागाला पैसे उकळायचे आहेत, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.
या नव्या नियमामुळे चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.