Shivaji Park : शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळं बनवण्यास विरोध, हायकोर्टात याचिका
Shivaji Park Dadar, Mumbai : शिवाजी पार्कचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे
Shivaji Park Dadar, Mumbai : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालंय. दादरमधील शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, या मागणीने जोर धरला आहे. पण या मागणीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल कऱण्यात आली आहे. मुंबईची ओळख असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर कोणतंही स्मृतीस्थळं उभारण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी दादरच्या शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात करण्यात आला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते, अभिनेते उपस्थित होते. त्यानंतर आता तिथं बाळासाहेबांप्रमाणे लता मंगेशकरांचंही स्मारक व्हावं अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. त्यात काहींनी शिवाजी पार्क इथं लता दीदींचं स्मारक व्हावं, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि शिवाजी पार्क येथील स्थानिक रहिवासी प्रकाश बेलवाडेयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवर एक स्मृतीस्थळ उभारण्यात आलं आहे. मात्र, शिवाजी पार्क हे मुंबईतील एक लोकप्रिय क्रिडांगण असून त्याला क्रिडाक्षेत्रासह, राजकीय तसेच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे हा ठेवा तसाच जपावा आणि शिवाजी पार्क खेळाचे मैदानच राहावं, अशी मुख्य मागणी बेलवाडेयांनी या याचिकेत केली आहे. इथं अशी स्मृतीस्थळं किंवा स्मारकं उभारल्यास पार्काच्या मुळ आकाराला आणि सोबतच ऐतिहासिक महत्त्वालाही धोका निर्माण होईल. ज्येष्ठ गायिका आणि गानसम्राज्ञी लतादीदींबद्दल आपल्या मनात खूप आदर असून संगीत क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याची पुरेशी जाणीवही आपल्याला असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलेलं आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Lata Mangeshkar Memorial: शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवा; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, संजय राऊत म्हणाले...
Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट