Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
Shankar Jagtap : दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा खरा राजकीय वारसदार कोण, यावरून दिर–वहिणींमध्ये याआधीही खडाजंगी झाली आहे. त्याचा नवा अंक महापालिका निवडणुकीत पाहायला मिळतोय.

पिंपरी चिंचवड : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पश्चात कुटुंबातील वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप, अर्थात दिर–वहिणींमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानापूर्वी अश्विनी जगताप यांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ अशी हेडिंग देत व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला. आमदार शंकर जगताप यांनी ‘नमकहरामी’ व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप करत वहिणींनी सोशल मीडियावरून जहरी टीका केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. साहजिकच, शंकर जगताप यांना हे पचनी पडणं शक्य नव्हतं. काहीही करून आपल्या निष्ठावंत माऊली जगताप यांना निवडून आणायचंच, या हेतूने शंकर जगताप मतदान संपेपर्यंत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये ठाण मांडून होते. सायंकाळी ५.३० वाजता मतदान प्रक्रिया संपताच दिराने वहिणींवर पलटवार केला.
शंकर जगताप यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून थेट अश्विनी जगताप यांचा फोटो हटवला. कालपर्यंत दिराच्या पोस्टवर दिसणाऱ्या अश्विनी जगताप आज अचानक गायब झाल्याने वादाला आणखी फोडणी मिळाली आहे अन राजकीय वर्तुळात पुन्हा गृहकलहाची चर्चा रंगली.
खरं तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिर–वहिणींमधील वाद शमल्याचं चित्र होतं. मात्र प्रभाग 31 चे उमेदवार माऊली जगताप यांच्या एका पोस्टने हा गृहकलह पुन्हा चव्हाट्यावर आला.
शंकर जगताप यांनी माऊली जगताप यांच्या रूपाने प्रभाग 31 मध्ये अतिक्रमण केल्याची चर्चा आहे. हे तिथल्या भाजपमधील इच्छुकांना पचनी पडलं नाही. ज्यांना ही बाब खटकली, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून अश्विनी जगताप यांनी शिफारस केली होती. मात्र प्रत्यक्षात शंकर जगताप यांनी या सर्वांचा पत्ता कट केला. एका अर्थाने, वहिणींना राजकारणातून हद्दपार करण्याची ही खेळी दिराने खेळल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली.
अशातच माऊली जगताप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत वहिणींना अप्रत्यक्षपणे डिवचलं. माऊली जगताप यांनी गुलालात माखलेल्या स्वतःच्या फोटोसह पोस्ट करत लिहिलं—
“15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झालं.साथ असावी आयुष्यभराची, हीच माझी आशा…
कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा…
आपल्या प्रेमाचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही… तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!”
या पोस्टनंतर अश्विनी जगताप यांनी सोशल मीडियावरून पहिला वार केला.
“निष्ठा की विश्वासघात?”
“15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं,” असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्या सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास का?
याचा अर्थ असा की, तू 15 वर्षे भाऊंबरोबर नव्हतास, तर त्यांच्या ‘शेवटाची’ वाट पाहत होतास. ज्या भाऊंनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरोधात मनात इतकी वर्षे विष पेरून ठेवलंस? हे स्वप्न नाही, ही ‘नमकहरामी’ आहे.”
“विजयाचा गुलाल उधळताना भान हरपलंस, पण लक्षात ठेव—हे तुझं स्वप्न नसून तुझ्या सडलेल्या वृत्तीचं आणि बुद्धीचं प्रदर्शन आहे!”
अशी अतिशय जहरी टीका करत अश्विनी जगताप यांनी दिर शंकर जगताप यांनाही लक्ष्य केलं. भाऊंशी ‘नमकहरामी’ करणाऱ्याला उमेदवारी दिल्याचा आरोप करत त्यांनी दिरावरही तोंडसुख घेतलं.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा खरा राजकीय वारसदार कोण, यावरून दिर–वहिणींमध्ये याआधीही खडाजंगी झाली आहे. मात्र शंकर जगताप आमदार झाल्यानंतर हे वाद मिटल्याचं चित्र होतं. महापालिका निवडणुका लागल्यानंतर दिराने वहिणींच्या समर्थकांना उमेदवारी नाकारली आणि पुन्हा राजकीय डावपेच रचले जात असल्याचं पाहून अश्विनी जगताप अस्वस्थ झाल्या. आपला राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मतदानाच्या काही तास आधी ‘निष्ठा की विश्वासघात?’ असा सवाल उपस्थित केला. याचे परिणाम मतदानावरही जाणवल्याची चर्चा आहे. वहिणींच्या पोस्टचा फटका माऊली जगताप यांना बसू नये म्हणून शंकर जगताप यांनी प्रभागात ठाण मांडून विशेष खबरदारी घेतली.
मतदानाची वेळ संपताच दिराने पलटवार करत वहिणींचा फोटो आपल्या पोस्टमधून हटवला. कालपर्यंत प्रत्येक पोस्टमध्ये दिसणाऱ्या वहिणी, मतदारांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्टमधून अचानक गायब झाल्या. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्याईमुळे पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर जगताप यांच्या नावापुढे आमदारकी लागली. भाऊंच्या या उपकारांची जाणीव दोघांनीही विसरली आहे का? भाऊंचा राजकीय वारसदार ठरवण्याच्या नादात दिर आणि वहिणी भाऊंचं राजकीय साम्राज्य संपवू पाहत आहेत का, अशी चिंता आता जगताप कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
अश्विनी जगताप यांचा फोटो असलेलं पोस्टर आणि फोटो नसलेलं पोस्टर





















