(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. लतादीदींनी स्वत:ला पूर्णपणे संगीतासाठी वाहून घेतले.
Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या, ज्यांचा सात दशकांचा कार्यकाळ यशाने भरलेला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. भारतातील 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत.
लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. लतादीदींनी स्वत:ला पूर्णपणे संगीतासाठी वाहून घेतले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख आहे.
पाचव्या वर्षापासून गायनाची सुरुवात!
लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे झाला होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक कुशल थिएटर गायक होते. दीनानाथजींनी लतादीदी पाच वर्षांच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. त्याच्यासोबत आशा, उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायच्या. लतादीदींनी 'अमान अली खान साहिब' आणि नंतर 'अमानत खान' यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले.
लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजामुळे त्यांच्या प्रतिभेची लवकरच ओळख झाली. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतात होती. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली.
लता मंगेशकर यांना आपले स्थान निर्माण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बारीक आवाजामुळे अनेक संगीतकारांनी सुरुवातीला त्यांना काम देण्यास नकार दिला होता. लता मंगेशकरांची तुलना त्या काळातील प्रसिद्ध पार्श्वगायिका नूरजहा यांच्याशी झाली होती. पण, हळूहळू त्यांची आवड आणि प्रतिभा यांच्या जोरावर त्यांना काम मिळू लागले.
सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम
जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत. 1945 मध्ये, उस्ताद गुलाम हैदर, लतादीदींना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी एका निर्मात्याच्या स्टुडिओत घेऊन गेले, ज्यात कामिनी कौशल मुख्य भूमिकेत होती. त्या चित्रपटासाठी लतादीदींनी पार्श्वगायन करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, गुलाम हैदर यांची निराशा झाली.
1947 मध्ये वसंत जोगळेकर यांनी लतादीदींना त्यांच्या 'आपकी सेवा में' या चित्रपटात गाण्याची संधी दिली. या चित्रपटातील गाण्यांवरून लतादीदींची खूप चर्चा झाली. यानंतर लतादीदींनी मजबूर चित्रपटातील 'अंग्रेजी छोरा चला गया' आणि 'दिल मेरा तोडा ही मुझे कहीं का ना छोड तेरे प्यार ने' सारख्या गाण्यांनी स्वतःला सिद्ध केले.
'आयेगा आनेवाला'ने मिळवून दिली ओळख
तथापि, असे असूनही, लतादीदी अजूनही एक खास हिटच्या शोधात होत्या. 1949 मध्ये 'महल' चित्रपटातील 'आयेगा आनेवाला' या गाण्यातून लतादीदींना अशी संधी मिळाली. हे गाणे त्या काळातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुबालावर चित्रित करण्यात आले होते. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि लता आणि मधुबाला या दोघींसाठीही हा चित्रपट खूप लकी ठरला. यानंतर लतादीदींनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha