गणेशोत्सवानंतर मुंबईत 'विघ्न'? कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका, महापालिका प्रशासनाकडून चिंता व्यक्त
Mumbai Coronavirus Update : मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका असल्याची चिंता मुंबई महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे.
Mumbai Coronavirus Update : मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता मुंबई महापालिकेनं व्यक्त केली आहे. तसेच या महिन्यातील आकडेवारीही तेच दर्शवतेय. मुंबईत ऑगस्ट महिन्यात दररोज 200 ते 300 कोरोना रुग्णांची नोंद केली जात होती. पण सप्टेंबर महिन्यात हाच आकडा 350 ते 400 पर्यंत पोहोचला आहे. अशातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः आरतीच्या वेळी अनेक नागरिक एकत्र येतात आणि मास्कशिवाय आरतीसाठी सहभागी होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढणार असल्याचं, महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यातील चित्र मुंबईसाठी अत्यंत भयावह होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. अशातच दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या ही गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाच्या नंतरच्या काळात पाहायला मिळाली होती. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवावर मुंबई महापालिका बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आकडेवारीवर नजर टाकली, तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 400 ते 450 रुग्ण दररोज सापडत होते. आता गेल्या काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या जवळपास 350 ते 360 रुग्णांवर आली आहे. पण गणेशोत्सवाच्या काळात वाढलेली गर्दी आणि कोरोना नियमांचं उल्लंघन यांमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि दुसरं म्हणजे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये वाढणारी गर्दी. याठिकाणी नियमांचं पालन होतंय का? याकडे पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तरि नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन वारंवार प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. अशातच विसर्जन मिरवणूकींचं काय करायचं? हा प्रश्न सध्या महापालिकेसमोर आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा आकडा वाढू नये आणि तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
मुंबईत काल (मंगळवारी) दिवसभरात 365 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत काल (मंगळवारी) दिवसभरात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,12,570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4696 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1286 दिवसांवर गेला आहे.