ED raids Anil Parab : आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी : किरीट सोमय्या
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी," असं ते म्हणाले
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी," अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. "ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी," असं किरीट सोमय्या म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे. त्यात त्यांच्या शिवालय या शासकीय निवासस्थानासह वांद्र्यातील खासगी निवासस्थानाचाही समावेश आहे. ईडीने आज सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
एबीपी माझाशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, "सचिन वाझेने 100 कोटींच्या वसुलीत अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. , पोलीस बदल्यांमध्ये त्यांचं नाव आलं होतं. त्याआधी एका प्रकरणात ईडी चौकशी करत होती. तसंच लॉकडाऊन असताना अनिल परब यांनी २०-२१ मध्ये दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधलं. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली कोर्टात फौजदारी खटला दाखल केला. अनिल परब यांनी शेकडो कोटींचे गैरव्यवहार केला आहे. आयकर विभागाचे छापे पडले तेव्हा अनिल परब यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरात साडेतीन कोटी रुपये रोख सापडले. या सगळ्याचं कारवाईमध्ये रुपांतर झालं आहे."
ते पुढे म्हणाले की, "फौजदारी खटला भारत सरकारने दाखल केला आहे. फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने अनिल परब यांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी आताचं ठाकरे कुटुंब माफिया आहे, असं मी म्हणतो. सगळ्यात पहिली माहिती ठाकरे कुटुंबाला कळते, कारण ते घोटाळे करतात."
अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.
अनिल परब आणि छापेमारी
- उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी अनिल परब यांची ओळख
- अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला
- या प्रकरणी किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली
- अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असा दावा सोमय्यांनी केला
- काही दिवसांपूर्वी परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाची छापेमारी
संबंधित बातमी
ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा