(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई विमानतळावरील 'ड्युटी फ्री' दुकानांना यापुढे जीएसटी लागू नाही, मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
दुकानांवर जीएसटी लागू केल्यास त्यांच्या वस्तूच्या किंमतीत वाढ होईल आणि त्याचा परिणाम परकीय व्यापार वाढीस होईल, असंही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केलं आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर यापुढे जीएसटी लागणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप मालकांसह परदेशवाऱ्या करणाऱ्या ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप दुकानांना 'वस्तू सेवा कर' आणि 'सीमा शुल्क विभागाकडून कारणे दाखवा आणि फौजदारी खटल्यासंदर्भात नोटीस बजावल्याप्रकरणी फ्लेमिंगो ट्रॅव्हल रिटेल लिमिटेडच्या मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर केला आहे.
या निकालात वस्तू सेवा कर आणि सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या अखत्यारित आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप येत नाहीत. त्यामुळे ही दुकाने भारतात असली तरी त्यावर जीएसटी लागू होणार नाही. तसेच या दुकानांवर जीएसटी लागू केल्यास त्यांच्या वस्तूच्या किंमतीत वाढ होईल आणि त्याचा परिणाम परकीय व्यापार वाढीस होईल, असंही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केलं आहे. त्यामुळे ड्युटी फ्री शॉपवर जीएसटी लागू केल्यास 'ड्युटी फ्री शॉप' ची संकल्पानाच नष्ट होईल, अशी भितीही उच्च न्यायालयाने व्यक्त केली.
यासंदर्भातील केंद्र सरकारच्या एका अध्यादेशाचा तसेच न्यायालायाच्या काही निकालांचा दाखला देत उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉपमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर राज्य अथवा केंद्र सरकारचा जीएसटी कर आकारता येणार नाही, असं स्पष्ट केलं.