एक्स्प्लोर
महापालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिट, मात्र दर पावसात मुंबई पाण्यात बुडालेली दिसते : नितीन गडकरी
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपण बोरीवलीच्या कोरा केंद्रातील विस्तृत जागेवर मोठ्या प्रकल्पाची सुरूवात करू. या प्रकल्पासाठी 100 कोटी रूपयांचा निधी देण्याचं आश्वासन गडकरींनी यावेळी दिले.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डिपॉझिटसाठी ठेवले आहेत. मात्र दर पावसात मुंबई पाण्यात बुडालेली दिसते, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. पालिकेनं मनात आणलं तर मुंबईचा समुद्रकिनाराही मॉरिशसप्रमाणे काचेसारखा स्वच्छ होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले. अंदमान निकोबार नंतर देशांतर्गत भागात पहिलं कांदळवन उद्यान मुंबईत तयार होणार आहे. पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील गोराईत हा प्रकल्प उभा राहणार आहे. या उद्यानाचं भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. इटलीतील व्हेनिसप्रमाणे मुंबईत 'वॉटर टॅक्सी' सेवा सुरू करायला हवी, त्यातच भविष्य आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. मी मुंबईत जरी कमी येत असलो तरी मनापासून मी स्वत:ला एक मुंबईकर समजतो असेही गडकरी म्हणाले. गडकरी म्हणाले की, दिल्लीचं प्रदूषण नवीन प्रदूषण नियंत्रण योजनेमुळे जवळपास 26 टक्के कमी झालं आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा नागपूरचे महापौर होते. तेव्हा आपापलं टॉयलेटचं पाणी विकायचं असा प्रकल्प माझ्या मनात आला, जो आम्ही प्रत्यक्षात उतरवला. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमुळे आम्ही नागपुरात महापालिकेचा सर्व घाटा दूर करून नफा मिळवून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्व किनाऱ्यावरील 850 हेक्टरवरील आंतराराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाचा प्रकल्प संमत झाला तर खूप मोठी गोष्ट होईल, असेही ते म्हणाले. विदर्भातील 5 जिल्हे लवकरच डिझेलमुक्त होणार आहेत, येत्या काळात बायो सीएनजीचा वापर वाढवणार असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच महाराष्ट्रातही ई रिक्षा परमिट फ्री व्हायला हवी असेही गडकरी म्हणाले. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपण बोरीवलीच्या कोरा केंद्रातील विस्तृत जागेवर मोठ्या प्रकल्पाची सुरूवात करू. या प्रकल्पासाठी 100 कोटी रूपयांचा निधी देण्याचं आश्वासन गडकरींनी यावेळी दिले. राज्यमंत्र्यांचा भाजपला घरचा आहेर 'एकीकडे कांदळवन उद्यानाची घोषणा होत असताना दुसरीकडे बोरीवली दहिसर परिसरात शेकडो खारफुटी तोडून बेदायदेशीर झोपड्या आणि गोदामं उभी राहत आहेत याकडेही लक्ष द्यावं' अशी तक्रार करत या सोहळ्यात नगरविकास राज्यमंत्री योगेश शेलार यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























