Munde-Fadnavis Meet : धनंजय मुंडे रात्री साडेबारा वाजता सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस यांची भेट
Dhananjay Munde-Devendra Fadnavis Meet : धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास सागर या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Dhananjay Munde-Devendra Fadnavis Meet : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास सागर या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं कारण आणि भेटीमधील तपशील अद्याप कळू शकलेला नाही. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात.
महाराष्ट्रातील राजकारणात 30 जून हा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करणं हा त्यामधील सर्वात मोठा ट्विस्ट ठरला. पण या धक्कातंत्राची मालिका रात्र उलटल्यानंतरही संपली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेणं याची चर्चा सुरु झाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का, या भेटीत उद्याच्या राजकारणाची काही बिजे रोवली गेली आहेत का हे येणाऱ्या काळात कळेल.
फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंडे गेले असावेत : महेश तपासे
दरम्यान धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. महेश तपासे म्हणाले की, "नव्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस आणि धनंजय मुंडे हे भाजप युवा मोर्चामध्ये एकत्र होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असावेत. त्यामध्ये दुसरं काही कारण असणं गरजेचं नाही. धनंजय मुंडे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहे. विधानसभेत प्रमुख तोफ म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघतो. धनंजय मुंडे मुळातूनच भाजपकडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे संबंध असणं आणि त्यांनी भेट घेणं स्वाभाविक आहे."
राजकारणात नेत्यांच्या वागण्यावरुन अंदाज बांधावे लागतात : राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख
धनंजय मुंडे यांची मूळ जडणघडण भाजपमध्ये झालेली आहे. ते भाजपच्या कट्टर परिवारातील आहेत. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील गेले. त्यांची अनेक भाजप नेत्यांशी जवळीक आहे. शिवाय ते अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला यात राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली. शिवाय सत्तांतराच्या काळात ते कोरोनाग्रस्त होते. या सर्व घटनांचा एक समान धागा जोडायच्या झाल्या कर त्यातले संकेत सूचक असतात. राजकारणात कोणी कोणाला सहज भेटत नाही. रात्री साडेबाराला का भेटले हा प्रश्न पडणं साहजिक आहे. सुसंवाद कसा आहे, अजितदादा काही बोलतात का, ते काही प्रतिक्रिया देतात का याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आपसूक त्यांच्या निकवर्तीयांच्या कृतीचा संबंध जोडला जातो. यातून अर्थ काढायचे असतात. दिवसाचं आणि रात्रीचं राजकारण वेगळं असतं. रात्री किंवा पहाटे घडणाऱ्या राजकीय घटना दिवसा घडणाऱ्या घटनांना कलाटणी देणाऱ्या असतात. त्यामुळे कोण कधी भेटलं याचा खूप महत्त्व आहे," असं राजकीय विश्लेषक रवीकिरण देशमुख यांनी म्हटलं.