(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण जूनपर्यंत करावे; मुख्यमंत्र्यांच्या मुंबई महापालिकेला सूचना
मुंबईत स्ट्रीट फुड हब करण्यात येत असून त्यासाठी 62 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढवण्यात येणार असून नव्याने 22 हजार 774 शौचकुप बसवण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची संख्या वाढवणे, फुड हब तयार करणे, बस थांब्यांचे नुतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील पादचारी मार्गांचे वॉडनिहाय सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यासाठी 24 वॉर्डमधील 149 पादचारी मार्गांची निवड करण्यात आली आहे. यातील 90 टक्के मार्गांचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या मार्गांचे कशाप्रकारे सौदर्यीकरण केले जात आहे याचे सादरीकरण मुंबई महापालिका आयुक्तांनी केले. मुंबईत सुमारे 344 उड्डाणपुल असून त्यापैकी सौंदर्यीकरणासाठी 42 पुलांची निवड करण्यात आली आहे तर प्रत्येक वॉर्डातील पाच याप्रमाणे 120 वाहतुक बेटांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वरळी सी फेस येथे बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतुक सिग्नल अन्यत्र देखील लावावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुंबईत स्ट्रीट फुड हब करण्यात येत असून त्यासाठी 62 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढवण्यात येणार असून नव्याने 22 हजार 774 शौचकुप बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी 20 हजार 301 शौचकुपांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 8637 नविन प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहेत. महानगरातील 386 ठिकाणी पावसाचे पाणी साचून पुरस्थिती निर्माण होते. त्यातील 171 ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून 120 ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे एकूण 291 ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. मुंबई शहरात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरातील मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.