(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Vehicle Stickers: मुंबईत वाहनांसाठी 'कलर कोड सिस्टम', जाणून घ्या कुठे मिळणार हे स्टिकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या बहुतांश भागात निर्बंधांची पायमल्ली करत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आता थेट कारवाईचं पाऊल उचललं जाणार आहेत
मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळं आता प्रशासनानं काही कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. फक्त निर्णय़ घेण्यापुरताच मर्यादित न राहता आता त्यांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावरही काटेकोर नजर पोलीस यंत्रणांकडून ठेवण्यात येत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात निर्बंधांची पायमल्ली करत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आता थेट कारवाईचं पाऊल उचललं जाणार आहे. याअंतर्गत पोलिसांनी मुंबईत एक नवी नियमावली लागू केली आहे. ही नियमावली आहे, 'कलर कोड सिस्टम'ची.
रविवारपासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू होणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. ज्यानंतर ट्विटरच्या माध्यमातूनही यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली. अत्यावश्यक सेवांमध्येही वर्गवारी करत प्रत्येक सेवेसाठी काही गट करण्यात आले असून, या गटासाठी एक रंग निर्धारित करण्यात आला आहे. या रंगाचं स्टिकर त्या सेवेतील वाहनावर असणं बंधनकारक असणाऱ आहे.
मुंबई पोलिसांच्या या नियमावलीबाबतची माहिती समोर आल्यानंतर आता हे रंगीत स्टिकर नेमके कुठं उपलब्ध होणार हाच प्रश्न मुंबईकरांना पडला. ज्याबाबत माहिती देत हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं की, 'नागरिकांनी स्वतः प्रिंट करून सहा इंच व्यासाचे स्टिकर चिटकवावेत, नाहीतर पोलीस विनामूल्य ते चिटकवून देतील. या गाड्यांची ही तपासणी होऊ शकते. या स्टिकरसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल'.
'कलर कोड सिस्टम'चा नियम हा फक्त मुंबईपर्यंत वैध राहणार असून, ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांचे नियम काढावेत त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असंही ते म्हणाले.
Moving out for essentials? Know your stickers-
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 17, 2021
Red-For medical services vehicles
Green-For eatables/food transport vehicles
Yellow-For vehicles of essential workers
W.e.f. 8pm on 18 Apr-7am on 1 May#EssentialStickers pic.twitter.com/Mr6eoSMxwx
कोणत्या वाहनांसाठी कोणत्या रंगाचे स्टीकर लागू?
कलर कोड सिस्टमनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी लाल रंगाचं वर्तुळ लावणं बंधनकारक असेल. भाजीपाल्याच्या गाड्यांसाठी हिरव्या रंगाचं तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचं वर्तुळ असणं अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा खबरदारीचा उपाय अंमलात आणण्याचं ठरवलंय. दरम्यान, कलरकोडचा गैरवापर केल्यास 419 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.