Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील सरकारी, सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर लसीचा उद्या केवळ 'दुसरा डोस'
Mumbai Vaccination : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... उद्या मुंबईतल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक केंद्रांवर लसीचा केवळ दुसरा डोस बाकी असलेल्यांचं लसीकरण पार पडणार आहे.
Mumbai Vaccination : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. सध्या तरी कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हेच प्रमुख अस्त्र असल्याचं बोललं जात आहे. देशभरात सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं मात्र एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच, 4 सप्टेंबर रोजी मुंबईतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर लसीचा केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे.
उद्या मुंबईतल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक केंद्रांवर लसीचा केवळ दुसरा डोस बाकी असलेल्यांचं लसीकरण पार पडणार आहे. 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. 1 सप्टेंबरपर्यंत 69 लाख 26 हजार मुंबईकरांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. 1 सप्टेंबरपर्यंत 25 लाख 17 हजार मुंबईकरांना दुसरा डोस मिळाला असून त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.
लसीचा दुसरा डोस घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणं आवश्यक आहे. याच अनुषंगानं सर्व शासकीय आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर उद्या हे विशेष सत्र पार पडणार आहे. ज्या नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या डोसची तारिख आली आहे त्यांनी या सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3418 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.
राज्यात काल (गुरुवारी) 4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल (गुरुवारी) 4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 81 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे. राज्यात आज 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (59), नंदूरबार (2), धुळे (23), जालना (19), परभणी (49), हिंगोली (60), नांदेड (28), अकोला (23), वाशिम (5), बुलढाणा (60), यवतमाळ (13), नागपूर (82), वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (2), गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.