Mumbai University Senate Elections: सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; मुंबई विद्यापीठात गुलाल उधळणार
Mumbai University Senate Elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे.
Mumbai University Senate elections: मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला होणार असून या निवडणुकीचा निकाल 13 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीतील अर्ध्या जागा या राखीव प्रवर्गासाठी असणार आहेत.
दहा जागांपैकी पाच जागा राखीव प्रवर्गासाठी
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक एकूण दहा जागांसाठी होणार आहे, 10 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होईल. दहा जागांमध्ये दहा पैकी पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी असून पाच जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट
सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. तर उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत असणार आहे.
10 सप्टेंबरला पार पडणार सिनेट निवडणूक
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. 28 ऑगस्टला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान केलं जाईल.
13 सप्टेंबरला जाहीर होणार निकाल
सिनेट निवडणुकीचा निकाल मतपत्रिकांची छाननी आणि मतमोजणी करून 13 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी नामनिर्देशन अर्जाच्या वैधतेच्या संदर्भात कोणताही वाद किंवा शंका असल्यास 23 ऑगस्टपर्यंत कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे.
विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांकडून तयारी
मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकी संदर्भातील निवडणूक अधिसूचना जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्ष, विद्यार्थी संघटना या अनेक महिन्यांपासून मतदार नोंदणीमध्ये व्यस्त होत्या. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी तयारी केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेना कशी कामगिरी करणार, याकडे सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत. त्याशिवाय, शिवसेना शिंदे गट, भाजप, काँग्रेसशी संबंधितही संघटना जोर लावणार आहेत. इतरही लहान संघटना उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत.
मनसेचा लागणार कस
मनसेच्या वतीने मुंबईत नुकताच सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सचा मेळावा भरवण्यात आला होता. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीबद्दल वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे उत्तम काम करत असून येत्या सिनेट निवडणुकांमध्येही त्यांना त्याचा उत्तम दाखला मिळेल, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील दहाच्या दहा जागा मनविसे जिंकेल, अशी आशा देखील राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यामुळे विजयाचा गुलाल कोणता पक्ष किंवा संघटना उडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा: