Mumbai University : भाजपच्या आशिष शेलार यांचे पत्र आणि मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला स्थगिती; काय आहेत कारणे?
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांच्या अंतिम यादीमध्ये मतदारांच्या नावामध्ये तफावत असल्याची तक्रार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती.
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच त्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन बैठकीने ही निवडणूक स्थगित केल्यानंतर आता या निर्णयावर विद्यार्थी संघटनांकडून टीका केली जात आहे. सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तसे त्यांनी एक पत्र राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून 9 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवार अर्ज भरण्याची शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम तारीख होती. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती का देण्यात आली?
- भाजप आमदार आशिष शेलार यांनी 7 ऑगस्टला मुंबई विद्यापीठाला पत्र देऊन सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार केली.
- या निवडणुकीसाठी एकूण 1,13,271 पदवीधर मतदारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यापैकी 72,658 पदवीधर मतदारांची प्राथमिक यादी घोषित करण्यात आली होती.
- म्हणजे 40,613 मतदारांचे अर्ज बाद करण्यात आले. अर्जदारांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. त्याचा निपटारा केल्यानंतर 94 हजार 631 मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
- विद्यापीठामार्फत जी मतदारांची अंतिम यादी घोषित करण्यात आलेली आहे, त्या अंतिम यादीमध्ये प्रथम दर्शनी 755 हून अधिक मतदारांची नावे दोन वेळा असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर अनेक मतदारांची नावे ही तीन वेळा आल्याचे निदर्शनास आलेले आहे.
- तसेच हजारो नावे हे हेतूपुरस्सर यादीत समाविष्ट केल्याचे समोर आलेले आहे. जी नावे वाढलेली आहे यामध्ये नावे सारखी असली तरी त्यांची जन्म दिनांक आणि पत्ता यामध्ये काही अंशी बदल करण्यात आल्याची तक्रार आमदार आशिष शेलार यांनी विद्यापीठ आणि शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे केली.
- हे पत्र मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून मुंबई विद्यापीठाला सदर विषयाची चौकशी करेपर्यंत मुंबई सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करावा अशा सूचना करण्यात आल्या.
असा होता निवडणुकीचा कार्यक्रम
ही निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता.
ही बातमी वाचा: