Sudhir Joshi Passed Away : मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांना आवाज देणारे सच्चे शिवसैनिक हरपले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सुधीर जोशी यांना श्रद्धांजली
शिवसेनेचे जेष्ठ नेते तसंच माजी मंत्री सुधीर जोशी यांचं निधन झालं असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Sudhir Joshi Passed Away : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईचे माजी महापौर तसंच माजी मंत्री सुधीर जोशी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता सुधीर जोशी यांना आज आपण गमावले आहे. त्यांच्यारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मीळ झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
सुधीरभाऊंनी मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून दिलेले योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी श्रद्धांजलीही दिवंगत जोशी यांना अर्पण केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक होते, त्यांच्या निधनाने शिवसेना एका सच्चा शिवसैनिकाला मुकली आहे. सुधीरभाऊंच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असही ठाकरे यांनी नमूद केलं. तसंच जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अनेकांना रोजगाराचा हक्क मिळवून दिला!
मुख्यमंत्री यांनी या शोकसंदेशात सांगितले की, कार्यकर्त्याचा पिंड आणि जनसामान्यांबद्दल प्रचंड कळवळा असल्यानेच दिवंगत सुधीरभाऊंनी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देण्याचा लढा उभारला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या राजकारण आणि समाजकारणातील समतोल साधण्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सुधीरभाऊ अखेरपर्यंत काम करत राहीले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक कामगार, कर्मचारी संघटनांची त्यांनी उत्कृष्ट बांधणी केली. या संघटनेमुळेच मराठी भूमिपुत्रांना अनेक रोजगार, नोकऱ्यांच्या उत्तमोत्तम संधी मिळविता आल्या. सामान्य माणसांना, कष्टकरी-कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी मदत करण्यात ते सातत्याने आघाडीवर होते. विधिमंडळात पोहचल्यावरही त्यांनी आपल्या अभ्यासू मांडणीने आणि अंगभूत हुशारीने अशाच प्रश्नांची मांडणी केली. त्यामाध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवत, अनेकांना न्याय मिळवून दिला. असंही मुख्यमंत्री यांनी नमूद केलं आहे.
हे ही वाचा -
- Sudhir Joshi passed away : शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Sudhir Joshi passed away : सुधीर जोशी यांच्या जाण्याने शिवसेनेने एक अनमोल हिरा गमावला : संजय राऊत
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा






















