Mumbai Rain updates: मुंबईत सकाळी 9 वाजता अंधार, ढगांचा प्रचंड गडगडाट, अलर्ट खरा ठरला, मुसळधार पावसाला सुरुवात
Mumbai Rain updates: मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे.

Mumbai Rain updates: मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा (Mumbai Rain Updates) जोर वाढला आहे. तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. तर अंधेरी, वांद्रे, गोरेगावर परिसरात सगळीकडे अंधार झालेला आहे.
मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. सीएसएमटी, जेजे उड्डाणपूल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. किंग्ज सर्कल परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी वडाळा परिसरात काहीकाळ पावसाचं पाणी साचलं होतं. चुनाभट्टी भागात देखील पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. धावजी केणी रोड येथील स्वदेशी मिल कामगार वसाहतीत पहिल्याच पावसात घरात पाणी घुसल्याचे दिसून आले.
मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अॅलर्ट-
मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 मेनंतर पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार, तर पहाटेपासून अंबरनाथ - बदलापूर या भागात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बदलापूर, अंबरनाथसह उपनगरात काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता-
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाकडून सतर्कतेची सूचना जारी करण्यात आलीय. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना मंत्रालयाकडून करण्यात आली.
अलर्ट खरा ठरला, मुसळधार पावसाला सुरुवात-
आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात आज (सोमवार, 26 मे) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. रात्री धुवाधार सरी कोसळून गेल्यानंतर पुन्हा पहाटे पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 3 तासांत मुंबई आणि उपनगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची पाहायला मिळतेय.
मुंबईच्या लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम-
मध्य रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने येणारी जलद वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 7-8 मिनिटं उशिराने सुरू आहे.
























