Mumbai Prabhadevi Rada : ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने, प्रभादेवीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या वेळी राडा
Mumbai Prabhadevi Rada : प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. विकासकामांच्या उदघाटन करताना श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचं कळतं.
![Mumbai Prabhadevi Rada : ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने, प्रभादेवीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या वेळी राडा Mumbai Prabhadevi Rada Thackeray Shinde group face off again at the inauguration of development works in Prabhadevi area Mumbai Prabhadevi Rada : ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने, प्रभादेवीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या वेळी राडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/71d76122e3d0af1ea41212b536f06ca6166901974958383_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Prabhadevi Rada : प्रभादेवी (Prabhadevi) रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) आमनेसामने आला. विकासकामांच्या उदघाटन करताना श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचं कळतं. ठाकरे गटाकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या भागातील विकासकामांचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्या हस्ते होणार होतं. परंतु यावेळी तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करुन उद्घाटनाला विरोध करण्यात आला. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ याच्या नुतनीकरणाचं हाती घेण्यात आलं होतं. या नुतनीकरणाच्या कामाचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होत होतं. मात्र याचवेळी ठाकरे गटाते कार्यकर्ते इथे दाखल झाले. हे काम ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलं आहे. त्यांनीच या कामाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे याचं श्रेय शिवसेनेच्या ठाकरे गटाला जातं, असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
यावरुन श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित झाला. समाधान सरवणकर हे उद्घाटन करत असतानाच ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. याबाबत अजय चौधरी यांना विचारलं असता ते म्हणाले की, याचं संपूर्ण काम मी केलं असताना शिंदे गटाकडून अशाप्रकारे उद्घाटन केलं जात असेल तर आम्ही विरोध करु. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट विकासकामांच्या नुतनीकरणाच्या उद्घाटनाच्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकले.
गणेश विसर्जनादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात राडा
याआधी देखील प्रभादेवी परिसरातच गणेश विसर्जनादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला होता. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गटाने आरोप केला होता की, विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी आयोजित विसर्जन मिरवणुकीदरम्यान सदा सरवणकर यांनी गोळ्या झाडल्या, सोबतच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. यादरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सोबतच घटनास्थळावरुन एक गोळी देखील जप्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)