Mumbai Blast Threat Call: "मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे..."; मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी, यंत्रणा अलर्ट मोडवर
Mumbai Blast Threat Call: मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. ट्विटरवर आलेल्या मेसेजमधून ही धमकी देण्यात आली आहे.
Mumbai Blast Threat Call: मी मुंबईत (Mumbai News) बॉम्बस्फोट करणार आहे... मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा निनावी धमकी मिळाली आहे. पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन (E-Mail) नाहीतर थेट ट्विटरवरुन (Twitter) धमकी मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत जिथे पोलिसांना फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून धमक्या मिळत होत्या, तिथे आता एका व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (22 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर "मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे" असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं मेसेजमध्ये लिहिलं होतं की, "I M Gonna Blast The Mumbai Very Soon." हा मेसेज गांभीर्यानं घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
यापूर्वीही आलेली 26/11 सारखा हल्ला घडवण्याची धमकी
रविवारी (21 मे) एका व्यक्तीनं मुंबई पोलिसांना फोन करून 26/11 हल्ल्याप्रमाणे शहरात दहशत माजवण्याचा कट असल्याचं सांगत धमकी दिली होती. पोलिसांना धमकीचा निनावी फोन राजस्थानमधून आला होता, त्यानंतर राजस्थान पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणावर तात्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, फोनवरुन निनावी धमकी देणारी व्यक्ती मानसिक आजारांनी ग्रस्त होती. त्यातूनच संबंधित व्यक्तीनं ते कृत्य केलं होतं.
फेब्रुवारी महिन्यातही आलेली धमकी
मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणांना अशा धमक्या येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात एनआयएला धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख होता. या ईमेलनंतर शहरभरातील पोलीस अलर्ट मोडवर आले होते.