मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधल्याचे पुरावे द्या; संजय राऊतांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश
Mumbai Police Notice To Sanjay Raut : खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर आता मुंबई पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mumbai Police Notice To Sanjay Raut : मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या आरोपाप्रकरणी आता संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून त्याची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 7 कडून संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जात असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.
मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश क्राईम ब्रँचला दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना नोटिस पाठवण्यात आली असून केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास सांगितल्याची माहिती आहे.
Sanjay Raut Allegation On CMO : संजय राऊतांनी काय आरोप केले होते?
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर काही आरोप केले होते. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशीं संपर्क साधला जातोय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय. काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीच्या आधी बाहेर काढण्याचं षढयंत्र रचलं जातंय. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री कार्यालयातील या गोष्टींवर नजर ठेवली पाहिजे, म्हणजे त्यांना समजेल काय सुरू आहे ते.
संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे. आता संजय राऊत यांना या प्रकरणी लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल अशी माहिती आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर पुरावे द्यावेत, आम्ही कारवाई करू अशी पोलिसांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे दिले नाहीत तर या प्रकरणी त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी वाचा: