अमेरिकन मॉडेलची मुंबईत हत्या, 19 वर्षानंतर आरोपीला मुंबई पोलिसांकडून युरोपात बेड्या
Mumbai police : प्रग्नेश देसाई या अनिवासी भारतीयाचे अमेरिकेच्या लिओना स्विडेस्की या मॉडेलशी प्रेमसंबध होते. मात्र त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून त्याने मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन तिची हत्या केली होती.

Mumbai police : मुंबईत खून करणाऱ्या आरोपीला युरोपातून अटक करण्यात आलीय. विपुल पटेल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या एका विशेष पथकाने 21 मे रोजी युरोपमधील प्राग या शहरातून पटेल याला अटक केलीय. हे पथक विपुल पटेलचा ताबा घेवून 27 मे रोजी भारतात परतलं आहे. आज आरोपीला ठाणे न्यायालयासमोर हजरं केलं असता, न्यायलयाने आरोपीला 10 जुलै पर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
19 वर्षानंतर आरोपीला बेड्या
लिओन स्विडेस्की या 33 वर्षीय अमेरिकन मॉडेलची 8 फेब्रुवारी 2003 रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत फेकला होता. अमेरिकन सरकारने त्यावेळी लिओनाच्या हत्येची गंभीर दखल घेतली होती. या तपासासाठी त्यांचं एक पथक मीरा रोडला पाठवलं होतं. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी लिओनचा प्रियकर अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल या दोघांना अटक केली होती. या खटल्याचा निकाल एका वर्षातच लागला होता. परंतु, दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते.
अमेरिकन सरकारने गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आवहान दिलं होतं. न्यायलयात या प्रकरणाची सुनवाणी होत असे त्यावेळी दोन्ही आरोपी गैरहजर राहत असत. त्यामुळे खटल्यात प्रगती होत नव्हती. या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्त सदानंद दाते यांनी घेवून तपास जलदगतीने सुरु केला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई याला बडोद्यामधून न्यायालयात हजर करण्यात आले. तर विपुल पटेल हा इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. आयुक्त दाते यांनी या प्रकरणी इंटरपोलची मदत घेतली आणि विपुल पटेलचा शोध घेऊन त्याला युरोपमधील चेक रिपब्लिक येथील प्राग शहरातील विमानतळावर इंटरपोलच्या मदतीने ताब्यात घेतलं, अशी माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या या विशेष पथकात परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त अमित काळे, काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे, गुन्हे शाखा तीनचे विरष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, नवघर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे यांचा सहभाग होता.
काय आहे प्रकरण?
प्रग्नेश देसाई या अनिवासी भारतीयाचे अमेरिकेच्या लिओना स्विडेस्की या मॉडेलशी प्रेमसंबध होते. मात्र त्यांच्यात वाद झाला होता. लिओनाने प्रग्नेशच्या पत्नीला ठार मारण्याची सुपारी अमेरिकेतील माफियाला दिली होती. ही माहिती प्रग्नेशला समजली. त्यामुळे त्यापूर्वीच लिओनीला ठार करुन तिच्या एक दक्षलक्ष डॉलर्स विम्याचे पैसे हडप करण्यासाठी त्याने ही योजना बनवली. त्यासाठी त्याने विपुल पटेल, अल्ताफ पटेल आणि फारुक अन्सारी या तिघांना 30 लाख रूपयांची सुपारी दिली. 8 फेब्रुवारी 2003 रोजी लिओनाला भारतात बोलावून तिची हत्या केली. याप्रकरणी 2004 मध्ये प्रग्नेश आणि विपुल निर्दोष सुटले होते. न्यायालयाच्या या निकालाला उच्च न्यायलयात अव्हान देण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत विपुल इंग्लडमध्ये पसार झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
