मुंबईत ऑनलाईन बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्याला बेड्या, आतापर्यंत 29 जणांना गंडा
ऑनलाईन बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केला आहे. रेमडेसिवीरच्या नावाखाली अँटिबायोटिक इंजेक्शन विकून पैसे कमवत होता.
मुंबई : राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी एका मेडिकलमधून दुसऱ्या मेडिकलमध्ये धावपळ करत आहेत. मात्र तरीही त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीये. याचाच गैरफायदा घेत नागरिकांना बनावट रेमडेसिवीर देऊन फसवणूक करत त्यांच्या जीवाशी खेळ सुरू केल्याचं काही घटनांमधून समोर आलं आहे. चेंबूर येथे राहाणाऱ्या मेघना ठक्कर यांना अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजवर रेमडेसिवीर मागवणे महागात पडले आहे.
एका व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर रुपेश गुप्ता नामक व्यक्ती रेमडेसिवीर देत असल्याचा मेसेज आला होता. यात त्याचा नंबर देखील होता. मेघना यांनी या रुपेश गुप्ताला संपर्क केला असता त्याने एका इंजेक्शनची किंमत त्याने 3 हजार रुपये सांगितली. यावर मेघना यांनी 18 हजार रुपयांची सहा इंजेक्शन मागवली आणि पैसे गुगल पेच्या माध्यमातून दिले. त्यांना तीन तासानंतर एका बॉक्समध्ये इंजेक्शन आले देखील. मात्र या इंजेक्शनवर ना लेबल होते ना काही नाव आणि आत फक्त पावडर होती.
नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीत चक्क पाणी भरून विक्री, टोळीला अटक
आपली फसवणूक झाल्याचे मेघना यांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. टिळक नगर पोलिसांनी काही तासातच या प्रकरणी पालघर येथून रुपेश गुप्ता या आरोपीला ताब्यात घेतले. यानंतर त्याने त्याच्या एका मेडिकल क्षेत्रातील मित्राने त्याला अँटिबायोटिक इंजेक्शन रेमडेसिवीरच्या नावाने विकून पैसे कमावण्याची ही आयडिया दिल्याचे सांगितले. त्याने आतापर्यंत 29 जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. मात्र मेघना यांच्या तक्रारीमुळे रुपेश गुप्ताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आणखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
- Remdesivir Injection | नागपुरात प्रियकराच्या मदतीने रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या नर्सला अटक
- Remdesivir | केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेमडेसिवीर आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला
- नागपूरसाठी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन द्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश