ATM Card : एटीएम कार्ड क्लोन करुन ग्राहकांची कोट्यवधींची लूट, मुंबई पोलिसांकडून 9 जणांना अटक
एटीएम कार्ड क्लोन करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संपूर्ण टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींनी आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त नागरिकांना मुंबईत लुटले आहे.
मुंबई : ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचं असतं. ऑनलाईन व्यवहारांमध्ये एका चुकीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड बरोबर त्याचा पिन कोणाला सांगत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकते. हॉटेल, कपड्यांचे दुकान,आईस्क्रीम पार्लर अशा विविध ठिकाणी एटीएम कार्डबरोबर पिन देणे ग्राहकास महागात पडले आहे. बारमध्ये स्किमर मशिनच्या सहाय्याने एटीएम कार्ड क्लोन करून ग्राहकांनीच दिलेल्या एटीएम पिनच्या मदतीने खात्यातून परस्पर पैसे काढणाऱ्या टोळीला मुंबई गुन्हे शाखा 9 ने अटक केली आहे.
एचडीएफसी बँकेच्या अकाउंटमधून नागरिकांचे पैसे एटीएमच्या माध्यमातून गेल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानुसार हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून येथून एका व्यतीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासणी केली असताना त्याच्याकडे एक एटीएम कार्ड क्लोन करून त्यातून पैसे काढल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. यामध्ये पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या सर्व आरोपींनी आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त नागरिकांना मुंबईत लुटले आहे.
WEB EXCLUSIVE | तुमचं ATM कार्ड क्लोनिंगपासून कसं वाचवाल? ATM Card सावधगिरीने कसं वापराल?
मुंबई पोलीसांनी या टोळीकडून नऊ स्किमर मशीन जप्त केल्या आहे. आरोपी या मशीनला कोड भाषेत उंदिर बोलत असे. कॉपीराईट करण्यासाठी वापरत असणाऱ्या मशीनला घूस असं बोलले जात असे. पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, नऊ स्किमर मशीन, कॉपीराईट मशीन 200 पेक्षा मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड, 3 मोबाईल तर 27 हजार रुपये जप्त केले आहेत. क्लोनिंग केलेल्या कार्डमधून आरोपी सातारा, सांगली ,कोल्हापूर अशा विविध भागात जाऊन पैसे काढत. तर आतापर्यत यांनी करोडो रुपयांची लूट केली आहे. सर्व आरोपी 12 वी पर्यंत शिकले असून अशाप्रकारे लोकांची लूट करत होते.
नागरिकांना अशारीतीने गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारपासून तुम्ही देखील सावध राहा. तुमचे एटीम कार्ड पिन कुणाला देऊ नका. नाहीतर आरोपीकडे असणाऱ्या 'उंदिर'च्या माध्यमातून पैशाची लूट होऊ शकते, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
74 एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन जप्त, लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ATM आणि OTP ची माहिती कुणालाही देऊ नका, बॅंक खात्यांवर ऑनलाईन चोरांची नजर