Mumbai News : मोठी बातमी : दोन वर्षांचा चिमुकला चौथ्या मजल्यावरुन पडला, दवाखान्यात नेताना अॅम्ब्युलन्स 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकली, वाटेतच जीव सोडला!
Mumbai News : वसई पेल्हार परिसरात राहणारा दोन वर्षांचा चिमुकला चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना अॅम्ब्युलन्स 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकली होती.

Mumbai News : वसई परिसरात गुरुवारी (दि. 18) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेला आहे. ही घटना प्रशासनाच्या वाहतूक नियोजनातील हलगर्जीपणाचे उदाहरण ठरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेल्हार परिसरात राहणारा रियान शेख (वय २) हा गुरुवारी दुपारी एका अपघातात चौथ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
पाच तास रुग्णवाहिका अडकली महामार्गावर
रियानला वाचवण्यासाठी दुपारी सुमारे 2.30 वाजता रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले. मात्र, त्या दिवशी मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून राहिली, आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच रियानची प्रकृती ढासळू लागली.
कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नसल्याने, अखेर रियानच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्याच ससूनवघर गावातील एका लहान रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
वसई परिसरात संतापाची लाट
या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण वसई परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी महामार्गावरील वाहतूक नियोजनातील त्रुटी, देखभाल दुरुस्तीतील अक्षम्य हलगर्जीपणा आणि आपत्कालीन सेवांमध्ये रुग्णवाहिकांना दिले जाणारे कमी प्राधान्य यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या या महामार्गावर प्रशासनाची कोणतीही ठोस कृती दिसून आली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आमदार स्नेहा दुबेंची प्रतिक्रिया
याबाबत स्थानिक आमदार स्नेहा दुबे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या महिन्याभरापासून येथील रस्ते खराब आहेत. म्हणून ट्रॅफिक होत होती. परंतु, परवा रात्रीपासून ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी एक अधिसूचना जारी केली. सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना ठाणे शहरात बंदी घातली. त्यामुळे जी तीन-चार तासाची ट्राफिक रस्त्यावर होत होती, ती आता आणखीन वाढली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे. आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. मात्र अधिसूचना मागे घ्यावी आणि यातून मार्ग काढावा, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























