Mumbai News : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन, तासाभरात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Mumbai News: बोरिवली पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या व्यक्तीला तासाभरात अटक केली आहे.
Threat Call To Mumbai Police : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai News) धमकीचं सत्र सुरुच आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब (Bomb Blast) ठेवल्याची धमकी अनेकदा देण्यात आली. मुंबईवर हल्ला करण्याचा एक फोन कॉल काल मुंबई पोलिसांना आला होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता बोरिवली पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या व्यक्तीला तासाभरात अटक केली आहे. या आरोपीवर मुंबईतील वाकोला, खेरवाडी, बीकेसी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी रोजी सात वाजता पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाकडून बोरीवली पोलिसांना मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार असल्याचा माहिती फोन आला. सायंकाळी सातच्या सुमारास हा फोन आला होता. फोनवर माहिती देण्यात आली की, काही वेळापूर्वी हल्ला करणाऱ्या व्यक्तीने बोरीवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा पकडली आहे. त्या रिक्षात अगोदरच दोघेजण बसले होते. मुंबईवर हल्ला करण्याची त्यांची चर्चा सुरु होती. या तिघांनी ती रिक्षा गोविंदनगर बोरीवली पश्चिम येथे सोडली.
दुसरा फोन केला आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फोन करणारा आणि त्या रिक्षाचा शोध घेण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय माडये यांच्या नेतृत्वाखाली एटीसी पथकाचे अधिकारी प्रमोद निंबाळकर, इंद्रजित पाटील यांच्या पथकाने गोविंद नगर परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असतानाच त्या कॉलरने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करुन कळवले की, रिक्षामध्ये बसून हल्ला करण्याची चर्चा करत होते. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे कॉलरला एक्सर डोंगरी परिसरातील घरातून छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा फोनची तपासणी केली. धमकीचे फोन हे त्या व्यक्तीनेच केले असल्याचे निष्पन्न होताच अटक करण्यात आली आहे.
आरोपीवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद
या आरोपीवर मुंबईतील वाकोला, खेरवाडी, बीकेसी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात येथे विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. वाकोला पोलीस ठाणे हद्दीत त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे समोर झाले आहे. सध्या बोरिवली पोलिसांनी या आरोपीला अटक करुन अधिक तपास करत आहेत. कॉल करणाऱ्याच्या विरोधात कलम 505 (1) (ब) 505 (2) 507, 182 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.