Mumbai News : महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार
Mumbai News : महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्यासाठी मुंबई महापालिका आणि नगरविकास विभागाकडून पर्यायी जागांचा विचार सुरु आहे. रेसकोर्ससाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडनंतर आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार केला जात आहे.
Mumbai News : मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) महालक्ष्मी येथील रेसकोर्स (Mahalaxmi Race Course) जागेवर थीम पार्क (Theme Park) उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जागा पूर्ण आपल्या मालकीची व्हावी, यासाठी राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. मात्र, महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेत जर थीम पार्क साकारायचे असेल, तर मग रेसकोर्ससाठी पर्यायी जागा कोणती? याचा विचार मुंबई महापालिका आणि नगरविकास विभाग करत आहे.
याआधी मुलुंड डम्पिंग ग्राऊंड परिसरातील जागेचा विचार करण्यात आला होता. मात्र ही जागा व्यवहार्य नसल्याचं समोर आलं. कारण मुलुंडच्या जागेवर जर रेसकोर्स साकारायचं असेल तर त्यासाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या आसपासची खाजगी मालकीची जागा विकत घ्यावी लागणार आहे आणि त्याला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे. त्यामुळे आता मुंबई बाहेरील उरण आणि खारघरमधील सिडकोच्या जागेचा विचार रेस कोर्ससाठी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
...म्हणून उरण आणि खारघर सिडकोच्या जागेचा विचार
शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे ( मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सागरी सेतूवरील वाहतूक सुरु करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा सागरी सेतू वाहतुकीसाठी सुरु झाल्यास मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतील. मुंबईकरांना रेसकोर्स उरण किंवा खारघर सिडकोच्या जागेत झाल्यास सहज ये जा करणे शक्य होऊ शकते, असा विचार केला जात आहे. मात्र हे सगळे पर्याय विचाराधीन असून कुठलाही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सच्या 30 टक्के भूखंडाची मालकी बीएमसीकडे
दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी इथल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला 1914 मध्ये 99 वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आला होता. महालक्ष्मी येथील रेसकोर्समधील जागेचा करार हा 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 ला संपुष्टात आला होता. त्यामुळे या जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत यातील 30 टक्के भूखंडाची मालकी बीएमसीकडे (BMC) आहे. त्यामुळे संपूर्ण भूखंड हा बीएमसीला थीम पार्क साकारण्यासाठी द्यावा, अशा मागणीचं पत्र मुंबई महापालिका राज्य सरकारला पाठवणार आहे
महालक्ष्मी रेसकोर्सच्या नुतनीकरणाचे अधिकार राज्य सरकारकडे
दरम्यान 10 वर्षांपूर्वी जागेचा करार संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारने महालक्ष्मी रेसकोर्सच्या नुतनीकरणाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रेसकोर्सच्या भूखंडाचे महानगरपालिकेला नुतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे कराराचे नुतनीकरण किंवा त्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडाचे क्षेत्रफळ 8.5 लाख चौरस मीटर इतके आहे. त्यापैकी केवळ 2.5 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे संपूर्ण भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे राज्य सरकारला करण्यात येणार आहे.
हेही वाचा
Mumbai News : महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन