...तर तीनच आठवड्यात मुंबईचे लसीकरण करण्याचे नियोजन : आदित्य ठाकरे
मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी लसीच्या जागतिक खरेदीबाबत शक्यता पडताळण्याच्या मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई : जगभरातील इतर देशांकडून कोरोनाची लस खरेदी करता येते का त्याची चाचपणी सुरु आहे. हे जर शक्य झालं तर केवळ तीनच आठवड्यात संपूर्ण मुंबईचे लसीकरण करण्याचे नियोजन तयार असल्याचं पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. आदित्य ठाकरे यांनी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरुन खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "सध्या कोरोना प्रतिंबधक लसीसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप ऑपरेट करू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत."
मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत, अशी माहितीही मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही मंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईचे लसीकरण तीन आठवड्यात करण्याचे नियोजन तयार असल्याच्या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. त्यात लसीकरणाचा वेगळा विषय होणार नाही. राज्याच्या लसीकरणाबाबत योग्य तो निर्णय होईल."
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य पावलं उचलावीत, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्रातून विनंती
- Deepali Chavan Suicide Case : निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर
- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, पैशाची अफरातफर केल्याचा आरोप